नाशिक : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना आव्हान देणाऱ्या मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना व त्यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांना यापूर्वी मतदारांनी पराभूत केलेले आहे. हे विसरु नये, नेहमी मराठा समाजाचा द्वेष करणाऱ्या भुजबळांना यंदा येवल्यातून पराभूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आव्हान मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर (Karan Gaikar) यांनी दिले आहे. 


राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मनोज जरांगे पाटील यांना आव्हान करण्याची भाषा वापरली होती. मनोज जरांगे पाटलांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी २८८ मतदारसंघात उमेदवार उभे करून दाखवावेत आणि माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, असे ओपन चॅलेंज भुजबळांनी दिले होते. 


छगन भुजबळांकडून सातत्याने मराठा समाजाचा द्वेष


यावरून करण गायकर म्हणाले की, छगन भुजबळांना व त्यांच्या पुतण्याला नाशिक जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी लोकसभेच्या मागील निवडणुकीमध्ये पराभव बघायला लावलेला आहे. यावेळी गुडघ्याला बाशिंग बांधून नाशिक लोकसभेची तयारी केलेल्या भुजबळांना साधी उमेदवारी ही दिली नाही हे भुजबळांनी विसरू नये. छगन भुजबळ हे सातत्याने मराठा समाजाचा द्वेष करत आलेले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत. 


स्वतःचे हसू करून घेऊ नये


भुजबळ यांना पराभूत करण्यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची गरज पडणार नाही. तुम्हाला येवला लासलगाव मतदार संघातील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मराठा समाजाचा कोणीही व्यक्ती या निवडणुकीत तुमचा पराभव करेल. कारण आता मराठा समाजासह सर्व जाती धर्मातील लोकांना तुमचा जातीयवाद लक्षात आला आहे. त्यामुळे तुम्ही असली विधान करून स्वतःचे हसू करून घेऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. 


पराभव दिसू लागल्याने वैफल्यग्रस्त वक्तव्य 


करण गायकर पुढे म्हणाले की, भुजबळांना आता पराभव स्पष्ट दिसू लागल्याने काही दिवसांपूर्वी नांदूरमध्यमेश्वर या ग्रामपंचायतीच्या उद्घाटन सोहळ्याला छगन भुजबळांना निमंत्रण दिलं नाही म्हणून त्यांनी थेट सरपंचाच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली. यातूनच छगन भुजबळ यांना त्यांचा पराभव दिसून येत असल्यामुळे ते असे वैफल्यग्रस्त वक्तव्य करताना दिसून येत आहे. 


यापुढे विजयाचा गुलाल उधळू देणार नाही


मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे आपले राजकीय अस्तित्व संपेल या भीतीने ते सातत्याने मराठा आरक्षणाच्या विरोधात कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. परंतु यात त्यांना यश येत नसल्याने ते थेट मनोज जरांगे पाटलांवर खोटे नाटे आरोप लावून स्वतःची उंची वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. मराठा समाज  त्यांना यात कधीच यश येऊ देणार नाही. यापुढे मराठा समाज किंवा इतर समाजाच्या विरोधात जातीयवाद करून राजकीय पोळी भाजण्याचे कृत्य भुजबळांनी थांबवावे, अन्यथा परत विजयाचा गुलाल लागू देणार नाही, करण गायकर यांनी दिला आहे.


आणखी वाचा 


Chhagan Bhujbal : हिंमत असेल तर माझ्याविरोधात निवडणूक लढा, भुजबळांचं जरांगे पाटलांना ओपन चॅलेंज