संभाजीनगर: राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अशातच आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एमआयएमला देखील सोबत घेतल्यास आम्ही जायला तयार असल्याचं इम्तियाज जलील म्हणाले होते. असं असतानाच आता इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडी सोबत जाण्याबाबतचा एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत आपली काही नेत्यांसोबत चर्चा देखील झाल्याचं जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले आहे. 


यावेळी बोलताना ते म्हणाले, अनेक तास ही चर्चा चालली. तसेच आमची जेवढी ताकद आहे तेवढी आम्ही चर्चा करू असे देखील मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितलं. पण महाविकास आघाडीकडून कोणतेही उत्तर आले नाही. त्याचं कारण म्हणजे स्टेजवर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यासोबत मी देखील बसेल असा प्रस्ताव दिल्याने महाविकास आघाडीकडून उत्तर येत नसल्याचे जलील म्हणाले आहे. जलील (Imtiaz Jaleel) हे नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.


काय म्हणाले इम्तियाज जलील? 


मी त्यांना सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी तयार आहोत. कारण आपण सर्वजण मिळून भाजपच्या ताकदीला उत्तग देऊ शकू. आम्हाला एकनाथ शिंदे यांची सत्ता नको आहे. अनेक तास याबाबत नेत्यांशी चर्चा झाली, मी त्यांना सांगितलं आमची जितकी ताकद आहे, त्यानुसार आम्ही चर्चा करू. जर आमची ताकद २५ जागांची असेल तर आम्ही २५ ची चर्चा करू, ५० ची असेल तर ५० ची १० ची असेल तर १०ची तुम्ही याबाबत बोला तर आधी. त्यांनी सांगितलं आधी आम्हाला आमच्यात चर्चा करू द्या. 


व्यासपीठावर तीनच खुर्च्या हव्यात


इतके दिवस लागले चर्चा करण्यासाठी आणखी कोणतही उत्तर आलेलं नाही. त्याच कारण म्हणजे जेव्हा स्टेज असेल त्यावर फक्त तीन खुर्च्या ठेवल्या जातील. एकावर उध्दव ठाकरे बसतील दुसऱ्या खुर्चीवर शरद पवार बसतील आणि तिसऱ्या खुर्चीवर नाना पटोले बसतील. पण मी सांगितलं ३ नाही तर ४ खुर्च्या लागतील असं मी त्यांना म्हटलं त्यावर त्यांनी आम्ही तुम्हाला सोबत तर घेऊ मात्र, शेजारी नाही बसवू शकत असं जलील (Imtiaz Jaleel) यावेळी बोलताना म्हणालेत. 


त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीसोबत मिळून लढण्याचा प्रस्ताव आम्ही दिला आहे. महाविकास आघाडीच्या काही नेत्यांशी चर्चाही झाली आहे. मात्र, त्यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला. त्याला बराच काळ झाला आहे. येत्या ९ सप्टेंबरपर्यंत वाट बघू आणि त्यानंतर पक्षाच्या इच्छुकांना अर्ज वितरित करण्यास सुरुवात करू, असे एआयएमआयएमचे नेते व माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी म्हटलं आहे.