मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत 150 पेक्षा अधिक जागा लढवण्याचा भाजपचा निर्धार कायम असल्याचे दिसून येत आहे. कारण भाजपमधील (BJP) वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा विधानसभेला पक्षाने 150 जागा लढवणे कशाप्रकारे आवश्यक आहे, हा मुद्दा उचलून धरला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhansabha Election 2024) भाजपने महाराष्ट्रात अमित शाह यांचे विश्वासू असलेले भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती. भूपेंद्र यादव सध्या महाराष्ट्रात चांगलेच सक्रिय झाले आहेत.
भूपेंद्र यादव यांच्याकडून भाजपच्या विभागनिहाय मॅरेथॉन बैठका घेतल्या जाणार आहेत. ते सोमवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात एक बैठक घेणार आहेत. या बैठकीला प्रभारी भूपेंद्र यादव,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,महामंत्री संजय केनेकर,विजय चौधरी,विक्रांत पाटील,माधवी नाईक,चित्रा वाघ आणि श्रीकांत भारतीय उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील पाच महामंत्र्यांकडून विभागीय संघटनात्मक आढावा घेतला जाईल. त्याचप्रमाणे अमित शहा 16,17,18 तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. यासंदर्भातील देखील नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे. आज सकाळी 10 वाजता या बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने कोणते निर्णय घेतले जातात, हे पाहावे लागेल.
भाजप विधानसभेला 150 पेक्षा जास्त जागा लढवण्याची शक्यता
महाराष्ट्रात भाजपाने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात, असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विधानसभानिहाय मिळालेली मते आणि गेल्या विधानसभेत मिळालेली मते त्याचप्रमाणे सर्वेक्षण अहवाल याच्या आधारे विधानसभा निहाय उमेदवार निवडले जाणार आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या ती जागा त्याच पक्षाकडे राहील. मात्र काही मोजक्या जागा आहेत त्यामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे.
जिंकून येण्याची खात्री असलेला उमेदवार महायुतीतील कोणत्या पक्षाकडे आहे याबाबत लोकसभा निकाल व सर्वेक्षण अहवाल याचा आधार घेतला जाईल. आगामी विधानसभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागा निश्चितीचा अधिकार कोअर कमिटीच्या बैठकीत देण्यात आल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत जागा वाटप आणि विधान सभेची रणनीती यावर चर्चा झाल्याचे समजते.
आणखी वाचा
विधानसभा निवडणुकीत महायुतीचं जागावाटप कसं होणार? अजित पवारांनी थेट फॉर्म्युलाच सांगितला!