सांगली: आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील हे छगन भुजबळ यांना पाडण्याची भाषा करणार असतील तर ओबीसी समाजदेखील राज्यभरात मराठा आमदारांना पाडण्याची भूमिका घेईल, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी दिला. ते रविवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्याच्या (OBC Maha elgar Melava) व्यासपीठावरुन बोलत होते. यावेळी प्रकाश शेंडगे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भुजबळांवरील टीकेला प्रत्युत्तर दिले. जर भुजबळ यांना पाडण्याची भाषा केली जात असेल तर 160 मराठा आमदार पाडण्याची भूमिका ओबीसी समाजाने घेतली आहे. सरकारने सगेसोयरेचा जीआर काढला तर सरकारचे सर्व आमदार पाडू. राज्य सरकारने नव्याने वाटप करण्यात आलेले कुणबी दाखले रद्द करावेत, अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेले आहेच. आता राहिलेल्या आरक्षणावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मनोज जरांगे शिवीगाळ करतात, शिव्याचा उगम भटक्या वस्त्यावाड्यांवर होतो. मनोज जरांगे दररोज नवनवीन मागण्या करत आहेत. मनोज जरांगे यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षणाचा अट्टहास केला तर मात्र आमचा विरोध कायम असेल, असे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले. शेंडगे यांच्या या टीकेला आता मनोज जरांगे काय प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल. मनोज जरांगे सध्या मराठा शांतता रॅलीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सांगलीत पार पडलेल्या ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), पंकजा मुंडे (Pankaja Munde), प्रकाश शेंडगे (Prakash Shendge), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), लक्ष्मण हाके (Laxman Hake) आदी नेते उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील दररोज आपल्या नवनवीन मागण्या बदलत गेल्यामुळे मराठा आंदोलनाची दिशा भरकटली आहे. मनोज जरांगेंनी विधानसभेत उमेदवार दिले तर ओबीसी देखील आपली ताकद दाखवून जे ओबीसी आरक्षणाला विरोध करतील त्यांना पाडण्याचं काम करेल , याची ट्रायल लोकसभा निवडणुकीत झाली आहे, असेही प्रकाश शेंडगे यांनी म्हटले होते.
मनोज जरांगे यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार
मनोज जरांगे पाटील यांना रविवारी पुण्यातील शांतता रॅलीनंतर भोवळ आली होती. यानंतर त्यांना उपचारासाठी सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर कालपासून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ते सकाळी 11 च्या सुमारास अहिल्यानगरकडे रवाना होतील.
आणखी वाचा
मराठ्यांत माझ्यासकट 150 उमेदवार आहेत, मनोज जरांगेंनी शड्डू ठोकला