Sanjay Pandey Will Contest Versova Assembly Election 2024 : मुंबई : मुंबईच्या (Mumbai News) माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) रिंगणात उतरले असून त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकांची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, तरीदेखील सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं विधानसभेसाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. अशातच बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. फेसबुकवर पोस्ट करत स्वतः संजय पांडे यांनी वर्सोवातून विधानसभा निवडणूक (Versova Assembly Election 2024) लढवणार असल्याची घोषणा केल्याची माहिती मिळत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी स्वतः आपल्या उमेदवारीबाबत घोषणा केली. मात्र, कोणताही पक्ष सोबत नाही, असंदेखील संजय पांडे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, काल (रविवारी) संजय पांडे यांनी वर्सोवाच्या झुलेलाल मंदिरात नतमस्तक होतं प्रचाराला सुरूवात केली आहे.
आपल्या उमेदवारीबाबत घोषणा करताना संजय पांडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की, "आज वर्सोवा येथे झुलेलाल मंदिरातून वर्सोवा विधानसभा मतदारसंघासाठी प्रचारची सुरुवात केली आहे. कुठलाही पक्ष नाही, पण आम्ही प्रयत्न करू..."
बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात संजय पांडेंना झालेली अटक, प्रकरण काय?
संजय पांडे यांच्या कंपनीनं जवळपास आठ वर्ष नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती सीबीआयला (CBI) मिळाली होती. संजय पांडे यांच्या iSEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करून हे फोन टॅप केल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीनं केला होता. याचप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना अटक करण्यात आली होती.
संजय पांडे ज्यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक होते, तेव्हा त्यांनी परमबीर सिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला असल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आलेला. तसेच, NSE सर्व्हर कॉप्रमाईज केस प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आलेलं. चित्र रामकृष्णा प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती, ही कंपनी संजय पांडे यांची होती. या प्रकरणात बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. तसेच, संजय पांडे यांनी 2001 मध्ये आयटी ऑडिट फर्म सुरू केली होती. त्यानंतर जेव्हा त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही तेव्हा ते पुन्हा पोलीस सेवेत आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला आणि आईला फर्ममध्ये संचालक केलं. 2010 आणि 2015 च्या दरम्यान Isec Services Pvt Ltd नावाच्या फर्मला NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. सीबीआय आणि ईडीनं त्यांच्या फर्मची चौकशी सुरू केलेली. चौकशीनंतर संजय पांडेंना अटक करण्यात आली. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता.