सातारा: 2019 साली झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली होती. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांनी भाजपचे उमेदवार असलेल्या उदयनराजे भोसले यांना पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर भाजपकडून उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचे राज्यसभेत पुनर्वसन करण्यात आले होते. परंतु, आता लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Election 2024) पडघम वाजू लागताच उदयनराजे भोसेल यांनी पुन्हा एकदा सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.


उदयनराजे भोसले सोमवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना तुम्ही सातारा लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा श्रीनिवास पाटील यांना आव्हान देणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उदयनराजे यांनी म्हटले की, आपल्याकडे लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला विचार मांडण्याचा अधिकार आहे. श्रीनिवास पाटील हे वयाने मोठे आहेत, वडीलधारी व्यक्ती आहेत. त्यामुळे मी त्यांना आव्हान देण्याची भाषा करणार नाही. मला याबाबत फार बोलायचे नाही. यावर पत्रकारांनी उदयनराजे भोसले यांना, 'तुम्हाला सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवायची आहे का?' असा थेट प्रश्न विचारला. त्यावर उदयनराजे यांनी, 'माझी इच्छा जाऊ दे, तुमची इच्छा काय आहे?', असा प्रतिप्रश्न केला. परंतु, पत्रकारांनी प्रश्न लावून धरल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून लोकसभा लढवण्याची इच्छा जाहीर केली. ते म्हणाले की, प्रत्येकाची इच्छा असते. त्याला मी अपवाद नाही, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले. त्यामुळे भाजप नेतृत्त्व उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देणार का, याकडे आगामी काळात सगळ्यांचेच लक्ष असेल.


साताऱ्यात २०१९ च्या पोटनिवडणुकीत काय घडलं होतं?


2019 च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले साताऱ्यातून निवडून आले होते. मात्र, महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वी उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी दिली. त्यावेळी शरद पवार यांनी त्यांचे मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जुनेजाणते नेते असलेल्या श्रीनिवास पाटील यांना रिंगणात उतरवले होते. सातारा पोटनिवडणुकीचा प्रचार चर्चेचा विषय ठरला होता. यावेळी शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी साताऱ्यात एक सभा घेतली होती. ही सभा सुरु असताना अचानकपणे पाऊस आला होता. परंतु, शरद पवार यांनी पावसात भिजत आपले भाषण सुरुच ठेवले होते. त्यांचे पावसात भिजतानाचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. या एका सभेमुळे सातारा आणि उर्वरित महाराष्ट्रात निवडणुकीचं वारं राष्ट्रवादीच्या बाजूने फिरले होते. या सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय बुस्टर मिळाला होता. त्यामुळे २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पानिपत होईल असे अंदाज असतानाही पक्षाला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले होते. तसेच उदयनराजे भोसले यांनाही पराभवाचा धक्का बसला होता. 



आर्थिक मागासांना आरक्षण मिळाले पाहिजे: उदयनराजे भोसले


उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले.  मोदीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशभरात विकास पोहचवला आहे. महाराष्ट्रात आणि देशभरात विकास पाहायला मिळत आहे, त्यामुळे दुसरा विचार करणार नाही, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. 



नरेंद्र मोदी यांच्या कामाचे केले तोंड भरून केले कौतुक 


कोणत्याही समाजाची व्यक्ती असो, जो आर्थिक मागास आहे त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे. त्या काळात मंडल आयोगाकडून चूक झाली. आरक्षण फक्त हे फक्त मागासवर्गाला न देता, कुठल्याही जाती-धर्मातील व्यक्ती असू दे, मग ती आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल तर त्यांना मदत केली पाहिजे. खरंतर प्रत्येकाला वाटते की, आपल्यावर अन्याय होऊ नये. मराठा समाज जो विचार करतो तसाच विचार इतर समाजही करत आहेत, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले. 


आणखी वाचा


गडी एकटा निघाला...!, शरद पवारांना उद्देशून श्रीनिवास पाटील यांचं भावनिक गाणं