मुंबई : विधानसभा निवडणुकीत गर्भगळीत झालेल्या राष्ट्रवादी पक्षाला आजही 79 वर्षाच्या शरद पवारांच्याच नेतृत्वाची गरज असल्याचं चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत पडलेलं भगदाड विधानसभा निवडणुकीतही अधिक मोठं झालं. अनेकांनी पक्षाला रामराम करुन भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. शिवाय उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत ही जागा राखण्याचं मोठं आव्हान पक्षासमोर आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांसाठीचं एक भावनिक गाणं सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी  शेअर केलं आहे. साहिल विधाते यांनी या गाण्याची निर्मिती केली असून गायक राहुल वैद्यने हे गाणं गायलं आहे.


"ना सखा, ना सोबती, तरी ना हा नाही थांबला...गडी एकटा निघाला....!" असे या गाण्याचे शब्द असून ते शरद पवार यांना उद्देशून आहेत. श्रीनिवास यांच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या गाण्यात शरद पवार यांनी राज्य पातळीवर आणि केंद्रीय पातळीवर निभावलेली विविध पदं, नेते, कलाकार यांच्याबरोबरचे फोटो वापरले आहेत. विशेषतः शरद पवार संरक्षणमंत्री असताना त्यांनी सैनिकांबरोबर घालवलेला वेळ, सियाचीनची सफर हे फोटोही या गाण्यात वापरले आहेत. सातारा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पवारांची संरक्षणमंत्री म्हणून त्यांची जुनी ओळख या व्हिडीओमधून मांडण्यात आली आहे. तसंच या गाण्यात सत्तेच्या मोहापायी काही साप पळून गेल्याची ओळ आहे. त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्या उदयनराजे यांचं नाव न घेता टीका केली आहे.



तसंच श्रीनिवास पाटील यांनी शरद पवार आणि त्यांच्या साठ वर्षांच्या मैत्रीची आठवणही शेअर केली आहे. त्यासाठी 'शोले'मधील 'ये दोस्ती हम नहीं छोडेंगे' गाणं वापरण्यात आलं आहे.



एकूणच या निवडणुकीत 79 वर्षांचे शरद पवारच राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख चेहरा ठरले आहेत. गेली अनेक वर्षे राज्यातील राजकारणावर पकड असलेले शरद पवार किती संघर्ष करत आहेत, हे गाण्यातून दाखवून सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.