मुंबई : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी 87,717 मतांनी उदयनराजेंचा पराभव केला. निकाल लागल्यानंतर उदयनराजे यांनी पहिली प्रतिक्रिया ट्वीट करून दिली आहे. उदयनराजेंनी जनतेचे आणि रात्र दिवस प्रचारासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे. साताऱ्यात उदयनराजेंची लोकप्रियता तुफान आहे. ते कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढले तरी त्यांचा विजय निश्चित असतोच, असं कायम म्हटलं जातं. परंतु हा समज पोटनिवडणुकीत चुकीचा ठरला आहे.
उदयनराजे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, आज हरलो आहे पण थांबलो नाही, जिंकलो नाहीं पण संपलो ही नाही. लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील लाखों जनतेचे तसेच दिवस रात्र एक करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. सदैव आपल्या सेवेशी तत्पर.
https://twitter.com/Chh_Udayanraje/status/1187566295136362496
उदयनराजे भोसले यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सातारा लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सातारा लोकसभेची पोटनिवडणूक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच झाली. भारतीय प्रशासकीय सेवेत जिल्हाधिकारी म्हणून निवड झालेले, त्यानंतर राज्यपाल पद भूषवलेले, प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीने उदयनराजेंविरोधात उमेदवारी दिली. उदयनराजे त्यांच्या स्टाईलसाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांना सिनेमाचे डायलॉग मारत कॉलर उडवताना पाहिलं आहे. त्यामुळे साताऱ्यात कॉलरचा नाही तर स्कॉलरचा विजय झाल्याचं म्हटलं जात आहे.