Harshwardhan Patil : जनतेतून जो आवाज उठतो त्यासोबत राहणं महत्त्वाचं, पक्ष प्रवेशापूर्वी हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेण्याचं कारण सांगितलं
Harshwardhan Patil : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.
पुणे : भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (NCPSP) पक्षात प्रवेश करणार आहेत. आज इंदापूरमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी शरद पवार, जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत. एबीपी माझासोबत हर्षवर्धन पाटील यांनी संवाद साधला. ज्या मतदारसंघात आपण पिढ्यान पिढ्या राहतो, ज्या मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्ते कुठलीही अपेक्षा न बाळगता ठामपणे आपल्यासोबत उभे राहतात, त्या कार्यकर्त्यांची जी मागणी असते, जनतेतून जो आवाज उठतो त्या प्रवाहासोबत राहणं ही लोकशाहीत महत्त्वाची बाब आहे. आज त्याचा आदर करुन हजारो जण इंदापूर तालुक्यातील आमच्या विचाराचे सर्व कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत आहोत, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.
पक्षप्रवेशाबाबत काही बोलणी चालली नव्हती. इंदापूरचा मतदारसंघ महायुतीत दुसऱ्या पक्षाला जात असल्यानं निवडणूक लढवता येत नसल्यानं जनता अन् कार्यकर्ते अस्वस्थ झाले. यानंतर लोकांनी उठाव केला अन् हा निर्णय झाला, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी चांगली वागणूक दिली. त्यांच्यावर काही मर्यादा आल्या, त्यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेतल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणाले. नाराजी संदर्भातील प्रश्नावर भाष्य करण्याची गरज नाही, वरिष्ठ नेते निर्णय घेतील. अनेक जण इच्छा व्यक्त करत असतात, हे लोकशाहीचं लक्षण आहे, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं.
राजवर्धन पाटील काय म्हणाले?
या पक्षप्रवेशाबद्दल हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनी भूमिका मांडली आहे. गेल्या दोन तीन महिन्यांपासून कार्यकर्त्यांची इच्छा भाऊंनी तुतारी हातात घेतली पाहिजे ही होती. कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळं उत्साह आहे. कार्यकर्त्यांसाठी सगळ्यात जास्त आनंद होणार आहे, असं राजवर्धन पाटील म्हणाले.
काही जुने कार्यकर्ते नाराज असल्यासंदर्भातील प्रश्न विचारला असता राजवर्धन पाटील यांनी याची जबाबदारी पक्षानं घेतली असल्याची म्हटलं. जे काही जुने कार्यकर्ते आहेत ते आमच्यासाठी नवीन नाहीत. रोज आमच्या गाठीभेटी होत राहतात. सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे. भाऊंना आमदार करायचं हे आमचं मिशन आहे, त्या दृष्टीनं आम्ही कामाला लागलो आहे, असं राजवर्धन पाटील यांनी म्हटलं.
आजच्या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी जाहीर होईल का असा प्रश्न विचारला असता तुम्हाला कार्यक्रमातच कळेल. या सगळ्या गोष्टीची घोषणा कार्यक्रमात होईल. लोकांनीच यावेळी निवडणूक हाती घेतलेली आहे. इंदापूरमध्ये तुतारी वाजणार असल्याचं राजवर्धन पाटील यांनी म्हटलं.
इतर बातम्या :