Sudhir Mungantiwar नागपूर : भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची लवकरच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत भेट होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. जे पी नड्डा यांनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती स्वत: सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. येत्या 19 किंवा 20 तारखेला दिल्लीत ही भेट होण्याची शक्यता आहे. सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) यांना नवीन जबाबदारी मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सूतोवाच केलं होतं. त्या अनुषंगाने जे पी नड्डा यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत याच नवीन जबाबदारी वर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुधीर मुनंगटीवारांच्या खांद्यावर नव्या जबाबदारीची धुरा?
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीसंध्येला संपन्न झाला असून पुढील दोन दिवसांत जागावाटप देखील होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून माहिती देताना सांगितले. मात्र, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देत, अनेक दिग्गजांना डावलण्यात आलं आहे. त्यामध्ये, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 5 वरिष्ठ नेत्यांना मंत्रीपदातून वगळले आहे. तर, भाजपनेही शिंदे सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या 4 नेत्यांचा पत्ता कट केला आहे. त्यामध्ये, भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि रविंद्र चव्हाण यांचाही समावेश आहे. मात्र, रविंद्र चव्हाण यांना भाजपकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. मग, सुधीर मुनगंटीवार यांचं काय होणार, सुधीर मुनगंटीवारांना नेमकं कशामुळे मंत्रिपद नाकारण्यात आलं, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच, काल(16 डिसेंबरला) सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या भेटीला गेले होते. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये दीडतास चर्चा झाली असून त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. दरम्यान त्या भेटीनंतर आता उच्चपदस्थ नेत्यांमध्ये मोठ्या हालचाली केली जात असल्याची चर्चा आहे.
भाजप कार्यकर्त्यांची चंद्रपूर ते नागपुरपर्यंत पायी यात्रा
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात चंद्रपूर जिल्ह्यातील दिग्गज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना डावलेले गेल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये खदखद बघायला मिळत आहे. स्वतः मुनगंटीवार यांनी आपण निराश नसून जनसेवा करण्यासाठी सज्ज आहोत, अशी प्रतिक्रिया दिल्यानंतरही कार्यकर्त्यांचा संताप स्पष्टपणे पुढे आलाय. पक्षश्रेष्ठींची भेट घेत मुनगंटीवार यांच्या मंत्रिमंडळात समावेशासाठी आग्रही मागणी करण्यासाठी चंद्रपुरातून भाजप कार्यकर्त्यांनी पायी यात्रा प्रारंभ केली आहे. नागपुरात न्याय न मिळाल्यास हे कार्यकर्ते दिल्लीपर्यंत पायी यात्रा करणार आहेत. मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्यास चंद्रपूर जिल्हा वीस वर्ष मागे जाणार असून विकास पुरुष सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश करा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांना विशेष जबाबदारी- देवेंद्र फडणवीस
सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याशी आमचे बोलणे झाले आहे. पक्षाने त्यांना विशेष जबाबदारी देण्याचे ठरवले आहे. सुधीर मुनगंटीवार ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे आमच्या पक्षाने काहीतरी विचार करून त्यांना मंत्रिमंडळात घेतले नाही, असे स्पष्टोक्ती देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या चर्चेला पूर्णविराम दिला असल्याचे बोलले जात आहे.
आणखी वाचा