नाशिक: मला मंत्रिपद मिळाले की नाही, हा प्रश्न नाही. ज्याप्रकारे माझी अवहेलना करण्यात आली, त्याबद्दल मी नाराज आहे. पक्षश्रेष्ठींना मी त्यांच्या हातामधील लहान खेळणं वाटतो का? ते सांगतील तेव्हा बसायचं, त्यांनी सांगितल्यावर उठायचं, ते म्हणाले की निवडणूक लढवायची, असा परखड सवाल विचारत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार आणि प्रुफल पटेल यांना अप्रत्यक्षपणे खडे बोल सुनावले. ते मंगळवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी छगन भुजबळ यांनी मंत्रिपदापेक्षा पक्षातील नेत्यांकडून देण्यात आलेल्या वागणुकीविषयी नाराजी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीला मला नाशिकमधून उभं राहायला सांगण्यात आले होते. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे तु्म्ही लढावे, यासाठी आग्रही असल्याचे मला सांगण्यात आले. मी त्यासाठी पूर्ण तयारीही केली होती, तेव्हा चांगले वातावरणही तयार झाले होते. मात्र, ऐनवेळी आमच्या नेत्यांनी कच खाल्ली आणि माझे नाव घोषित केले नाही. त्यामुळे मी स्वत:च लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली. त्यानंतर मी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा सुनेत्रा पवार आणि नितीन पाटील यांना राज्यसभेवर संधी द्यायची आहे, असे सांगण्यात आले. तेव्हादेखील मी शांत बसतो. मी तेव्हा सांगितलं होतं की, राज्यसभेत माझ्या अनुभवाचा फायदा होईल. पण तेव्हा मला सांगण्यात आलं, तुम्ही महाराष्ट्रात असणं गरजेचे आहे. मात्र, आता विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर आणि जिंकल्यानंतर मला राज्यसभेवर जायला सांगितले जात आहे. त्यासाठी आता नितीन पाटील यांना राजीनामा द्यायला लावला जाईल. पण मी मागत होतो तेव्हा मला संधी देण्यात आली नाही, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली.
पण आता मी निवडणूक लढलो आहे. आता कुठे निवडणूक संपली आहे. मला माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे आहेत. निवडणुकीत माझ्यासाठी माझ्या लोकांनी जवा काढला. मी त्यांना काय सांगू? मी आता लगेच राजीनामा देऊ शकत नाही. राज्यसभेवर जायचे असल्यास मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे मी एक-दोन वर्षे थांबा, मी मतदारसंघात सगळं स्थिरस्थावर करुन राज्यसभेवर जातो, असे सांगितले होते. त्यानंतर आमचे नेते म्हणाले, यावर चर्चा करु, पण ते कधी चर्चेला बसले नाहीत, अशा थेट आरोप छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर केला.
देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात माझ्या समावेशासाठी आग्रही होते: छगन भुजबळ
यावेळी छगन भुजबळ यांनी एक गौप्यस्फोट केला. मला जे काही कळालं, त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझा मंत्रिमंडळात प्रवेश व्हावा, यासाठी आग्रही होते. मी या माहितीची खात्री करुन घेतली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षात कोणाला मंत्रिपद द्यायचे, याचा निर्णय घेतात. कोणी कितीही सांगितलं तरी मंत्रिपदाचा निर्णय पक्षप्रमुखांनी घ्यायचा असतो. आता मला कोणाच्या सांगण्यावरुन मंत्रीपद नाकारण्यात आले, हे शोधावे लागेल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
आणखी वाचा
मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....