जालना : एकीकडे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) शपथविधी पार पडला. यात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदनात उतरवले आहेत. 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तर फडणवीस सरकारला गंभीर इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.
मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाचा 15 ते 16 महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. मराठ्यांची आजही एकजूट कायम आहे. आजपर्यंत सरकारने मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिले जात नाही. त्यामुळे सामूहिक उपोषण करण्याचा निर्णय झाला आहे. ज्यांची उपोषणाची तयारी आहे त्यांनी यावं. 25 जानेवारीपासून पुन्हा अंतरवालीला आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
जरांगेंच्या सरकारकडे मागण्या
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे अध्यादेश काढावा. गॅजेटची तातडीने अंमलबजावणी करावी. सगे सोयऱ्याची अंमलबजावणी तातडीने करावी. आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी आहोत. मराठा आणि कुणबी एकच आहेत, अशा मागण्या आम्ही याआधी केलेल्या आहेत. हेच सरकार त्या वेळेस होते, आताही तेच सरकार आहे. सरकारने मराठ्यांवरील केसेस मागे घेऊ म्हटले होते, पण आतापर्यंत केसेस मागे घेतलेला नाहीत. सरकारने केसेस तातडीने मागे घ्याव्यात. शिंदे समितीकडून नोंदी शोधायचं काम पूर्णपणे बंद आहे. तातडीने तुम्ही शिंदे समितीचे काम सुरू करायला लावा. कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र रोखून धरले आहेत ते तातडीने वाटावे. सरकारने EWS आरक्षण रद्द केले आहे. SBEC आरक्षण मागितले नव्हते तरी ते दिले, त्यामुळे सरकारने कुणबी, EWS आणि SBEC तिन्ही ऑप्शन सुरू ठेवावे, अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या.
मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारला इशारा
ते पुढे म्हणाले की, आमच्या मागणीचे पुन्हा एक निवेदन जिल्हाधकाऱ्यांमार्फत सरकारला देणार आहोत. 25 जानेवारी 2025 पासून आम्ही अंतरवालीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार आहोत. 25 जानेवारीच्या आत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा सरकारला भयंकर आंदोलन बघावे लागेल, असा इशारा मनोज जरांगेंनी फडणवीस सरकारला दिलाय. तर 25 जानेवारी रोजी राज्यभरातील मराठ्यांनी अंतरवलीकडे यायचं. मराठ्यांची ताकद पुन्हा एकदा दाखवा. सर्वांनी स्वतः हा मेसेज सोशल मीडियावर पोस्ट करा. हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचे आहे. माझं गाव माझी जबाबदारीप्रमाणे आपणच आपल्या गावात बैठका करायच्या आहेत. सर्वांनी पत्रिका छापायच्या, प्रत्येक घरात जाऊन आमंत्रण द्यायचं. 25 जानेवारी 2025 ला कोणीही लग्नाची तारीख धरू नये, त्या दिवशी वाहानेच मिळणार नाहीत, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिले.
माझा कदाचित यात शेवटही होऊ शकतो
कोणीही घरच्यांच्या विरोधात जाऊन उपोषणाला बसू नये. मी एकटा खंबीर आहे. मी कधीही मॅनेज होणार नाही, फुटणार नाही. हे उपोषण मला सहन होत नाही, माझा कदाचित यात शेवटही होऊ शकतो. 100 टक्के मला वाटतं की, माझं शरीर साथ देत नाही, कदाचित माझा यात शेवट देखील होऊ शकतो. नव सरकार आलेलं नाही, तेच आता आहे, त्यांना संधी जशी दिली होती, आता या नवीन मुख्यमंत्र्यांना पण संधी देऊ. पूर्वी तेच होते आताही तेच होते, मराठ्यांच्या पुढे कोणतेच सरकार नाही. मराठ्यांच्याच्या जीवावर सत्ता आली.
आणखी वाचा