Santosh Deshmukh बीड: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचा निर्घूनपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी आंदोलनं करुन आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थ व आंदोलकांनी केली आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत 3 जणांना अटक केली असून आणखी काही आरोप मोकाट आहेत. मात्र, एका उमेद्या व विकासाची दृष्टी ठेऊन गावासाठी झटणाऱ्या युवा सरपंचाचा अशारितीने खून करण्यात आल्याने बीड जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणात बीडचे नेते आणि मत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचे आरोप केले जात आहेत. यावरुन आता हिवाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.


शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन विविध सवाल उपस्थित केले आहेत. वाल्मिक कराड (walmik karad) कोणाचा माणूस आहे?, शिंदे नावाच्या अधिकाऱ्यासोबत कोण बोललं?, खंडणी कोणाच्या नावाने मागितली?, असे प्रश्न उपस्थित करत पोलीस जनतेला वेडे समजतात का?, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. वाल्मिक कराड मेन आहे. बाकीच्याला काही अर्थ नाही. तो उजळ माथ्याने फिरतोय. त्याचा व्हिडीओ फिरतोय, रील येतायत.  उघडपणे बोलतो...तो माझ्या जातीचा आहे, वंजारी आहे. फोन तपासा, हफ्ता मागायला कोणी सांगितलं तपासा...वाल्मिक कराड यांच्याकडे बोटं का जातायत?, वाल्मिक कराड सरकार पेक्षा मोठा झालाय का?, कायद्याला गृहित धरलं जातंय, अशी आक्रमक भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.


कोण आहेत वाल्मिक कराड?


वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील दहा वर्षांपासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार पाहत आहेत. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मीक कराड नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असल्याचं दिसून येतात. यापूर्वी देखील 307 सारख्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा समावेश आढळून आला होता. आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांचा संबंध दिसून येत आहे, तर केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपात धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड यांचे देखील नाव वारंवार घेतले जात आहे. संतोष देशमुख खून प्रकरणात विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी आहे. जो धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचा निकटवर्तीय मानला जातो. वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी राजकीय आरोप प्रत्यारोप पहायला मिळत आहे.


जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?, VIDEO:



संबंधित बातमी:


धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?