Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे लुटलं, आता यांना घरातच बसावं लागेल; चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर पलटवार
येत्या 4 जूननंतर उद्धव ठाकरे यांना त्यांच्या आवडीचं काम म्हणजे घरात बसून राहण्याचं काम मिळेल असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
मुंबई: महाभ्रष्टाचारी आघाडीनं ज्यांच्या नेतृत्त्वात अडीच वर्षे राज्याला लुटलं ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींवर टीका करीत आहेत, हा एक मोठा विनोद असल्याचा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी लगावला आहे. यंदाही राहुल गांधींना जनता मतदानातून धडा शिकणार असून 4 जूननंतर उद्धव ठाकरेंना घरात बसून राहण्याचं आवडतं काम करावं लागेल असंही ते म्हणाले.
खंडणी वसुली गँग कोण चालवत होतं?
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्याला आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, "राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना खंडणी वसुली गँग कोण चालवत होतं हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. सचिन वाझेची नियुक्ती करून महिन्याला शंभर कोटी वसुलीची सुरूवात कोणी केली होती? याचं आधी उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावं."
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, खरं तर हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी भूमिका सोडल्यामुळे उद्धव ठाकरेंना शिवसेनेमधून शिवसैनिकांनीच तडीपार केलं, ते आता नकली शिवसेना घेऊन सोनियांना शरण गेले आहेत. त्यामुळेच तुकडे गँगचा म्होरक्या असलेल्या काँग्रेसचा जाहीरनामा देखील उद्धव ठाकरेंना प्रिय वाटतोय. पण उद्धव ठाकरेंनी हे लक्षात ठेवावं 2014, 2019 प्रमाणे यंदाही राहुल गांधींना जनता मतदानातून धडा शिकणार आहे आणि 4 जूननंतर त्यांना घरात बसून राहण्याचं आवडतं काम करावं लागेल.
महाभ्रष्टाचारी आघाडीनं ज्यांच्या नेतृत्त्वात अडीच वर्षे राज्याला लुटलं ते उद्धव ठाकरे आज पंतप्रधान आदरणीय @narendramodi जींवर टीका करीत आहेत. हा एक मोठा विनोद आहे.
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) April 9, 2024
मविआचं सरकार असताना खंडणी वसुली गॅंग कोण चालवत होतं ? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. सचिन वाझेची नियुक्ती…
भाजप सर्वात शक्तीशाली पक्ष
भाजपमध्ये अनेक नेते प्रवेश करत असून पक्ष आज कलेकलेने वाढत जातोय, त्यामुळे पक्ष कार्यालयात भाजपचे दुपट्टे कमी पडत आहेत असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते म्हणाले की, "गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. 6 एप्रिल 1980 ला मुंबईतील अरबी समुद्राच्या साक्षीने अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली आणि काँग्रेसचे दुष्ट शासन हद्दपार करण्याचा निश्चय त्यांनी त्यावेळी केला. इंदिरा गांधींनी देशावर लावलेली आणीबाणी, व्यक्ती स्वातंत्र्य, बेरोजगारी, महागाई अशा वाढत्या अनेक समस्यांचे निर्मूलन करून देशात रामराज्य यावे, या उदात्त हेतूने अटलजींनी भाजप पक्षाची स्थापना केली. आज इतक्या 44 वर्षात अनेकांनी भाजप पक्षाला देशातील सर्व शक्तिमान पक्ष म्हणून उभारी दिली."
ही बातमी वाचा: