BJP-JDU Rift: बिहारमधील युतीच्या भवितव्याबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार उद्या मोठा निर्णय घेऊ शकतात. त्यांनी पक्षातील महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. जेडीयूची भूमिका पाहता भाजप अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहे. भाजपच्या जवळच्या सूत्रांनी असं सांगितलं आहे की, भाजप सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. भाजपकडून नितीश कुमार यांचा पक्ष फोडण्याचा कोणताही प्रयत्न केला जाणार नाही. तसेच भाजप आपल्या बाजूने सरकार पाडण्यासाठी कोणतेही प्रयत्न करणार नाही.
याच दरम्यान जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी शनिवारी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजप आणि जेडीयूच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरु आहेत. यामुळेच बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची युती तुटण्याची चिन्हे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी रात्री काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही संपर्क साधला होता. त्यानंतर युती तुटण्याच्या चर्चांना जोर आला आहे.
आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी आपल्या पक्षातील सर्व खासदार आणि आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. जेडीयूने आपल्या सर्व आमदारांना सोमवारी संध्याकाळपर्यंत पाटण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीबाबत जेडीयूचे आमदार गोपाल मंडल यांनी सांगितले की, ''आम्हाला आज रात्रीपर्यंत पाटण्यात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बैठकीत काय होईल हे तूर्त सांगता येणार नाही. पण काहीतरी मोठे घडणार आहे. आम्ही आता युतीत आहोत. पण यात काही बदल होणार की नाही ते पुढे कळेल.'' यातच पक्षाचे प्रवक्ते केसी त्यागी म्हणाले की, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष जो काही निर्णय घेईल, तो जेडीयूच्या प्रत्येक सदस्याला मान्य असेल.
दरम्यान, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या NITI आयोगाच्या बैठकीतही नितीश कुमार सहभागी झाले नाहीत. या दरम्यान जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंग उर्फ लालन सिंग यांनी रविवारी भाजपवर निशाणा साधला आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांविरोधात षडयंत्र रचल्याचा दावा केला. तर जेडीयूचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी काँग्रेस आणि आरजेडीसोबत जाण्याच्या चर्चा फेटाळून लावत भाजपसोबत कोणतेही मतभेद नसल्याचे सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Venkaiah Naidu Farewell : कोणतंही काम नायडूंसाठी ओझं नव्हतं; पंतप्रधान मोदींकडून मावळत्या उपराष्ट्रपतींवर स्तुतीसुमनं
महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप? मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजपमधील संघर्ष का वाढला? 'ही' महत्त्वाची कारणं