मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला की रायगडच्या पालकमंत्रिपदाचाही प्रश्न मार्गी लागेल; भरत गोगावलेंचं मिश्कील भाष्य
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर आणि आंदोलनावर सरकारने वेगाने पाऊले उचलण्यास सुरुवाते कली आहेत.

रायगड : राजधानी मुंबईत सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांच्या आंदोलनाचा आज 5 वा दिवस असून उपोषणकर्त्यांची तब्बेत खालावली आहे. दुसरीकडे मराठ आंदोलक आक्रमक होत असून मोठ्या संख्येने आझाद मैदान परिसरात जमले आहेत. त्यामुळे, सरकारकडून आरक्षण मागणीचा हा तिढा नेमका कसा सुटणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या बैठका सुरू असून मराठा आरक्षणसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला असतानाच मंत्री भरत गोगावले (Bharat gogawale) यांनी रायगड पालकमंत्रीपदाच्या प्रश्नावरही मजेशीर भाष्य केलं. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला की रायगडच्या (Raigad) पालकमंत्रिपदाचाही प्रश्न मार्गी लागेल, असे त्यांनी म्हटले.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर आणि आंदोलनावर सरकारने वेगाने पाऊले उचलण्यास सुरुवाते कली आहेत. मराठा आरक्षणाच्या निर्णयावर सरकार योग्य भूमिका बजावत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी या निर्णयाबाबत तोडगा काढण्यासाठी तातडीची बैठक आहे. त्यामुळे सरकार याबाबत तोडगा काढण्यासाठी सकारात्मक आहे, अशी माहिती शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी दिली. तसेच, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबतही त्यांनी यावेळी भूमिका मांडली. मराठा आरक्षणासाठी बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिढा सुटला की रायगडच्या पालकमंत्रीपदाचा देखील तिढा सुटेल, असं मिश्कील भाष्य गोगावले यांनी केलं. यावेळी, उपस्थितांमध्येही हशा पिकला.
दरम्यान, महायुतीमध्ये रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने-सामने आहे. यासंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकाही झाल्या आहेत. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. काही दिवसांपूर्वी 15 ऑगस्ट रोजी रायगडच्या ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरे यांना मिळाला होता. त्यावेळीही भरत गोगावले यांनी जाहीरपणे नाराजी उघड केली होती. तर, आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जेव्हा तोडगा निघेल, त्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदावरही निघेल, असे म्हणत गोगवले यांनी मिश्कील टिपण्णी केलीय.
























