Sanjay Raut: प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव कोर्टाचं समन्स; संजय राऊत म्हणाले, मला अटक करण्याचा डाव
Sanjay Raut: काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा अटकेची टांगती तलवार लटकत आहे. संजय राऊत यांना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव कोर्टाने समन्स बजावले आहे.
Sanjay Raut: काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा अटकेची टांगती तलवार लटकत आहे. संजय राऊत यांना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव कोर्टाने समन्स बजावले आहे. तसेच त्यांना 1 डिसेंबरला न्यायालयात हजार राहण्याचे आदेश या समन्समध्ये देण्यात आले आहे. बेळगावात 30 मार्च 2018 रोजी केलेल्या भाषण प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे.
बेळगाव कोर्टाने पाठवलेलं समन्स आणि त्यावेळी केलेल्या भाषणावर संजय राऊत म्हणाले आहेत की, सीमा भागातील बांधवांवर कर्नाटक सरकारने हल्ले केले किंवा कायद्याचा बडगा दाखवून त्यांना तुरुंगात टाकलं, तर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतील. यामध्ये प्रक्षोभक काय आहे? हे मला कळलं नाही, असं ते म्हणाले आहेत. ते म्हणाले, 2018 मध्ये केलेल्या भाषणाची दखल घेऊन मला त्यांनी आता कोर्टात हजर राहण्यास सांगितलं आहे. याचा अर्थ मी तिथे कोर्टात जावं आणि कोर्टात गेल्यावर माझ्यावर हल्ला व्हावा, अशी माझ्याकडे माहिती असल्याचं ते म्हणाले आहेत.
मला अटक करण्याचा कट : राऊत
ते पुढे म्हणाले, तिथे मी गेल्यावर मला अटक करून, मला बेळगावच्या तुरुंगात टाकण्याचं कारस्थान सुरु असल्याचं दोन दिवसांपासून माझ्या कानावर येत आहे. ते म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्र संदर्भात केलेलं वक्तव्य देखील चार दिवसांपूर्वीच आहे. महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगलीकडील भाग तोडून कर्नाटकात घेण्यासंदर्भात त्यांनी वक्तव्य केलं आहे. त्यांनी एका विषयाला तोंड फोडलं आहे. त्याचवेळी आमच्या सारखी जी लोक आहे. जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहेत. त्यांना कायदेशीर बाबीत गुंतून बेळगावात बोलून त्यांच्यावर हल्ले करायचे, असे कारस्थान मला शिजताना दिसत आहे, याची दखल महाराष्ट्र सरकराने घ्यायला पाहिजे, असं ते म्हणाले आहेत. तसेच शिवसेना ही सीमा बांधवांसाठी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले आहेत.
मला अटकेची भीती नाही: राऊत
शिवसेनेने सीमा बांधवांसाठी 69 हुतात्मा दिले आहेत. मी बेळगावचा 70 वा हुतात्मा व्हायला तयार आहे, असं राऊत म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, बाळासाहेब ठाकरेंनी सीमा प्रश्नांसाठी तीन महिने तुरुंगवास भोगला होता. शिवसैनिकांनी त्यावेळेला तीन दिवस मुंबई पेटवली होती. त्यामुळे ती धग आमच्या मनात कायम आहे. मला अटकेची भीती नाही. महाराष्ट्रासाठी मला अटक होणार असेल तर मी नक्कीच बेळगावला जाईल.