Chandrarao Taware On Sharad Pawar : शरद पवार यांनी कुटुंबाला कारवाईपासून वाचवण्यासाठी पक्षात फूट पाडण्याचे नाटक केलं असल्याचा आरोप शरद पवार (Sharad Pawar) यांचे जुने सहकारी आणि विद्यमान भाजपचे नेते चंद्रराव तावरे (Chandrarao Taware) यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट नाही तर हे ठरवून केलेलं असल्याचा आरोप तावरे यांनी केला आहे. चंद्रराव तावरे हे 40 वर्षं शरद पवारांसोबत होते. शरद पवार यांच्या पहिल्या निवडणुकीच्या प्रचारापासून त्यांनी अनेक निवडणुकात त्यांचा प्रचार केला आहे.
'सुप्रिया सुळेंच्या निवडणुकीवेळी अजित पवार शांत बसून त्यांना मदत करणार'
शरद पवारांनी अनेक वेळा फोडाफोडीचे राजकारण केलं. पण आता जे ते करत आहेत ते जाणूनबुजून ठरवून कुटुंबाला वाचवण्यासाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे सगळं नाटक हे 2024 विधान सभा निवडणुकीपर्यंत सुरु असणार आहे. तोपर्यंत सगळ्या चौकशीतून क्लीन चिट घ्यायची असा डाव त्यांचा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे भाजपसोबत 90 जागा लढवणार आणि शरद पवार यांच्या जागा एकत्र घेऊन विधानसभेत राष्ट्रवादीचं सरकार आणणार असल्याचे तावरे म्हणाले. सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीवेळी अजित पवार शांत बसून त्यांना मदत करणार असल्याचं तावरे यांनी सांगितले.
अजित पवारांची शरद पवारांवर टीका
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं. 2 जुलै रोजी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने एकदा नव्हे तर तीन वेळा भाजपसोबत जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. तसंच शरद पवार यांच्या राजकारणातील धरसोडवृत्तीवरही भाष्य केलं. त्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, असं असलं तरी शरद पवार हे माझं आजही दैवत आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं होतं.
हेही वाचा