Sunil Tatkare On Majha Katta: अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही सर्वांचीच इच्छा आहे, पण सध्या तो प्रश्न नाही असं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. या आधी 56 आमदार असलेल्या पक्षाचा व्यक्ती मुख्यमंत्री झाला, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं कुणालाही वाटलं नव्हतं, पण त्यांना संधी मिळाली असं खासदार सुनील तटकरेंनी सांगितलं. आमच्याकडे 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अजित पवारांच्या बंडानंतर त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात ते बोलत होते.
Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री कधी होणार?
सुनील तटकरे म्हणाले की, आज महायुती म्हणून आम्ही युतीत समावेश झालो आहोत. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही सर्वांचीच इच्छा आहे. पण ती लगेच काही सफल होईल हे मानण्याचं कारण नाही. आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता आहे. 55-60 आमदार असणाऱ्या पक्षाचा व्यक्ती मुख्यमंत्री झाला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं कुणाला वाटलं होतं का? पण ते झाले. त्यामुळे अजितदादा मुख्यमंत्री होणं हा आताचा प्रश्न नाही.
अजित पवारांकडे किती आमदार?
अजित पवारांकडे किती आमदार आहेत असा प्रश्न विचारल्यानंतर सुनील तटकरे म्हणाले की, सध्या राजकीय अस्थिरता आहे. या काळात आम्ही एक भूमिका मांडली आणि त्या पद्धतीने आम्ही गेलो. आमची भूमिका मान्य असणाऱ्या आमदारांची संख्या ही 40 च्या वरती आहे. तीन चार लोकांचा अपवाद सोडला तर सर्वांनाच अजित पवारांना पाठिंबा आहे.
भाजपसोबत जाण्यास शरद पवार अडचण होते का?
सुनील तटकरे म्हणाले की, पक्षाने ज्या ज्या वेळी निर्णय घेतले त्यांच्यासोबत आम्ही गेलो. 1999 साली आम्ही काँग्रेसच्या विरोधात गेलो. त्याच्यानंतर आम्ही काँग्रेससोबत गेलो. पक्ष म्हणून आम्ही सर्वांनी एकत्रित काम केलं आणि एकत्रित निर्णय घेतले. साहेबांनी त्यांचा निर्णय आमच्यावर कधीही लादला नाही. आताही पक्षाने निर्णय घेतला आहे, आम्ही पक्षाच्या निर्णयासोबत चाललोय.
Sunil Tatkare On Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या बंडावेळीच भाजपसोबत जाणार होतो?
सुनील तटकरे म्हणाले की, काही वेळा राजकारणात अचूक टायमिंग साधावी लागते. 2019 साली शपथविधीचं झालं. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि त्यांचा निर्णय यशस्वी होतोय असं वाटत असताना अजितदादांच्या दालनात राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक झाली. त्यावेळी सर्व आमदार आणि मंत्र्यांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली. तशा आशयाचं पत्रही तयार झालं. त्याच्यानंतर पुढे काही कारणाने आम्ही सरकारमध्ये सामील होऊ शकलो नाही, त्याबद्दल अजित पवारांनी सांगितलं आहे.
आम्ही अडचणीत नव्हतो
आम्ही कोणत्या आरोपांना घाबरून भाजपसोबत गेलो नाही असं सुनील तटकरेंनी सांगितलं. ते म्हणाले की, माझ्यावर आणि अजितदादांवर या आधीच आरोप करण्यात आले होते. भाजपचे सरकार असताना याची चौकशीही झाली. पण त्यातून काहीही तथ्य सापडलं नाही. त्यामुळे आम्ही कुणाला तरी घाबरून भाजपसोबत गेलो या म्हणण्याला काही अर्थ नाही. केंद्रात ज्यांची सत्ता आहे त्यांच्या मदतीने राज्यात कामं करता येतील हा त्यामागचा उद्देश आहे.
Sunil Tatkare On Bharatshet Gogawale : भरत गोगावले यांना मंत्रीपद कधी?
भरत गोगावले यांना मंत्रिपदाची संधी कधी असा प्रश्न विचारला असता सुनील तटकरे म्हणाले की, ज्यावेळी आपण आघाडीमध्ये जातो, त्यावेळी सर्वच निर्णय आपल्या मनाप्रमाणे होतो असं काही नाही. त्यामुळे भरत गोगावले यांना मंत्री केलं तर मला वाईट वाटायचं काही कारण नाही. पालकमंत्रपद हे कुणाला द्यायचं हे आघाडीमधील सर्व पक्ष एकत्र येऊन निर्णय घेतात.
Sunil Tatkare On Sharad Pawar: पवारसाहेबांना असलेली सहानुभुती... काळच ठरवेल काय ते
शरद पवारांना असलेल्या सहानुभुतीच्या लाटेला कसं तोंड देणार असा प्रश्न विचारला असता सुनील तटकरे म्हणाले की, आतापर्यंत अजित पवारांनी पक्षाची भूमिका ही स्पष्टपणेम मांडली. पवार साहेब ज्या वेळी केंद्रात मंत्री होते त्यावेळी दादांनी मेहनत घेतली. 2004 मध्ये 71 जागा मिळाल्या, 2009 मध्ये 64 जागा मिळाल्या. अजितदादांनी आताही त्यांची भूमिका ही जनतेसमोर मांडली आहे. काळ हे ठरवेल, काळाच्या ओघात याचं उत्तर मिळेल.
Sunil Tatkare On NCP: पक्षावर दावा केला नाही... आम्हीच पक्ष
राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळी भूमिका घेत पक्षावर दावा लावणं कितपत योग्य आहे या प्रश्नावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षात फूट पडली असं आम्ही म्हणत नाही. आम्हीच राष्ट्रवादी आहोत. तशी भूमिका आम्ही निवडणूक आयोगाकडे मांडली आहे.
ही बातमी वाचा: