Ajit Pawar: बाबा तूच वस्तरा घे आणि काढ... मिशी काढण्याच्या वक्तव्यावरुन अजितदादांचा श्रीनिवास पवारांना टोला
Maharashtra Politics: अजित पवार यांनी आज सकाळी काटेवाडी येथे मतदान केले. अजित पवार यांनी श्रीनिवास पवार यांना प्रत्युत्तर दिले. अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील, असे श्रीनिवास पवार यांनी म्हटले होते.
बारामती: राज्यात 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील, असे वक्तव्य त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी अलीकडेच केले होते. या टीकेला अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बाबा तूच वस्तरा घे आणि काढ, असा टोला अजितदादांनी श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांना लगावला. बारामतीमधील काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनमोकळेपणाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत शरद पवार गटाच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले.
श्रीनिवास पवार यांनी अजितदादांची आईही पवार घराण्यातील संघर्षामुळे बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेल्याचे वक्तव्य केले होते. याबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. आमच्या समोरच्या लोकांनी कुटुंब एकत्र असल्याचे दाखवले. माझी आई सगळ्यात जेष्ठ आहे. माझी आई माझ्यासोबत आहे. माझी आई कोल्हापूरला होती. माझ्या आत्याच्या मुलाचे लग्न होते. मला तिने सांगितले होते की, मी मतदानाला तुझ्यासोबत येईल. माझी आई माझ्यासोबत आहे. आमचे कुटुंब फार मोठं आहे. आमच्या विरोधात फक्त तीन कुटुंब आहेत, बाकी कुणी माझ्याविरोधात नव्हते, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
सुनेत्रा, मी आणि आईने मतदान केले. ही भावकीची निवडणूक नाही. विकासाच्या मुद्द्याला महत्त्व दिले पाहिजे. त्यादृष्टीने मी प्रचार केला होता. मतदारसंघात कामं करण्यासाठी केंद्राचा निधी हवा आहे. जनतेने आम्हाला नेहमी साथ दिली, आजही देईल. महायुतीने चांगलं काम केले आहे. उन्हामुळे मतदानावर थोडा परिणाम होतोय, असे अजितदादांनी सांगितले.
यावेळी अजितदादांनी भोरमध्ये त्यांच्या गटाच्या नेत्यांनी पैसे वाटल्याच्या आरोपालाही प्रत्युत्तर दिले. याबद्दल अजित पवार म्हणाले की, आज ते आरोप करत आहेत. तुम्ही स्वत: PDCC बँक उघडी बघितली. जे आरोप करत आहेत, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय असे वाटते. मी त्याला उत्तर देणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.
शरद पवारांनी मतदानाचा हक्क बजावला
शरद पवार यांनी सकाळी पावणेनऊच्या सुमारास बारामतीच्या माळेवाडी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि त्यांची नात रेवती सुळे या उपस्थित होत्या. शरद पवार यांनी मतदान केल्यानंतर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
आणखी वाचा