आधी म्हणाले, मनोज जरांगेंचा फायदा झाला, आता सत्कार केला; ठाकरेंचा खासदार पुन्हा चर्चेत आला
मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन शिवसेना खासदाराने केला सत्कार, दोन दिवसांपूर्वीच जरांगेमुळे फायदा झाल्याची दिली होती कबुली
परभणी : राज्यातील लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात मराठवाड्यातील बीड आणि परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान झालं. राज्याचं लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक यंदा वेगळ्याच वळणावर केल्याचं दिसून आलं. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात अग्रस्थानी असल्याने यंदाच्या निवडणुकीत उपोषणकर्ते मनोज जरांगेंचा फॅक्टरही काम करुन गेला आहे. ज्याला पाडायचंय त्याला पाडा, असे म्हणत जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाला आवाहन केलं होतं. त्यामुळे, जरांगेंची नेमकी भूमिका उघड झाली नाही. मात्र, जरांगेचं कार्यक्षेत्र असलेल्या बीड, परभणी आणि जालना लोकसभा मतदारसंघात जातीय समीकरण चालल्याची चर्चा आता जोर धरत आहे. त्यातच, मला आणि बीडमध्ये बजरंग सोनवणेंना मनोज जरागेंचा फायदा झाल्याचं परभणीतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी म्हटलं आहे.
परभणीतील विद्यमान खासदार आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय जाधव यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट घेतली. मनोज जरांगेंचा ताफा अडवून खासदार जाधव यांनी जरांगेंचा सत्कार केला. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच त्यांनी मनोज जरांगेंचा आपल्याला फायदा झाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर, आज जरांगे यांची भेट घेऊन त्यांनी सत्कार केला. परभणीच्या पोखरणी येथे मनोज जरांगे मराठा आरक्षण व समाजाच्या गाठीभेटी दौऱ्यासाठी आले असता याठिकाणी त्यांची भेट घेऊन संजय जाधव यांनी सत्कार केला आहे. निवडणुकीनंतर मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आपल्याला फायदा झाला असल्याचं संजय जाधव यांनी कबूल केलं होतं, तसेच आपण त्यांना भेटणार असल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, आज दोघांची भेट झाली.
बीड, परभणीत जरांगे फॅक्टर
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा तीव्र केला होता. त्यामुळे, राज्यातील मराठा समाज एकवटल्याचं पाहायला मिळालं. मराठा समाजासाठी लढणारा हाडाचा कार्यकर्ता म्हणून जरांगेंची ओळख निर्माण झाली. त्यातूनच, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जरांगे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, राजकारण हे आपलं क्षेत्र नाही म्हणत जरांगेंनी थेट राजकीय प्रवेश टाळला. तसेच, राजकीय भूमिका घेणार नसल्याचेही जाहीर केले होते. मात्र, ज्याला पाडायचंय त्याला पाडा, असे म्हणत जरांगेंनी मराठा समाजाला सूचक इशाराही दिला होता. त्यामुळे, बी़ड आणि परभणी लोकसभा मतदारसंघात मराठा पॅटर्न चांगलाच चर्चेत राहिला. लोकसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असा वादही रंगल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळेच, पंकजा मुडेंनीही जाहीर भाषणातून बीडमधील जातीय राजकारणावर भाष्य केलं होतं. तर, परभणीतील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनीही नाव न घेता थेट जरांगेंवर निशाणा साधला आहे.
परभणीत जानकर विरुद्ध जाधव
परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव यांच्यात थेट लढत होती. मात्र, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा व मनोज जरांगेंचा फायदा आपल्याला झाला, असे म्हणत संजय जाधव यांनी कबुलीची दिली होती. विशेष म्हणजे बीडमध्येही बजरंग सोनवणेंचा मनोज जरांगेंचा फायदा झाल्याचं त्यांनी म्हटलं होत. त्यानंतर, आज त्यांनी भररस्त्यात जरांगेंची भेट घेऊन सत्कार केला, तसेच चर्चाही झाली.