लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मोठा भूकंप; अशोक चव्हाणांचा दावा, सांगितलं ठाकरे-पवारांचं राज'कारण'
अशोक चव्हाण यांनी सध्या भाजपातील परिस्थिती आणि काँग्रेसची बिकट अवस्था यावर भाष्य करताना अनेक प्रश्नांवर दिलखुलासपणे उत्तरे दिली.
मुंबई - काँग्रेसमधून भाजपात गेलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस पक्षातील खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्त्वावर हल्लाबोल केला. तसेच, लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला अनेक मोठे धक्के बसतील असे सुतोवाचही त्यांनी केले. लोकसभा निवडणूकीनंतर (Loksabha 2024) महाराष्ट्रात आणखी मोठे राजकीय भूकंप होतील. बरेच नेते मोठा निर्णय घेतील, सगळे मोठे नेते सोडून जात आहेत, असा दावाच अशोक चव्हाण यांनी केला आहे. संजय निरुपमसारखा चांगला नेता गेला, मिलिंद देवरा.. असे असंख्य नेते जे नाराज, अस्वस्थ आहेत. ज्यांना आपल्या भविष्याची चिंता आहे, ते लवकरच योग्य निर्णय घेतील याची मला खात्री असल्याचे चव्हाण यांनी म्हटले. यावेळी, आपण काँग्रेस पक्ष सोडण्यामागे नेमकं राजकारण काय घडलं, याचाही उलगडा करताना, उद्धव ठाकरे व शरद पवार यांचं राजकारणही सांगितलं.
अशोक चव्हाण यांनी सध्या भाजपातील परिस्थिती आणि काँग्रेसची बिकट अवस्था यावर भाष्य करताना अनेक प्रश्नांवर दिलखुलासपणे उत्तरे दिली. भाजपमध्ये मला पूर्ण मानसन्मान मिळत असून पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी पक्षाने दिली, ती मी चोखपणे पूर्ण करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा माझा हात धरत लोकांना अभिवादन केलं, तो क्षण माझ्यासाठी अमूल्य होता.तसं पाहिलं तर, मी मोदीजींना पक्षात येण्याआधीही बऱ्याच वेळेला भेटलो आहे. पण, बऱ्याच भेटींबद्दल कॅमेरासमोर बोलता येत नाही, असे म्हणत भाजपात आपण पूर्णपणे समाधानी असल्याचं खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितलं. तसेच, देशात मोदी सरकार आणि राज्यात महायुतीचं सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
म्हणून मी काँग्रेस सोडली
ज्या पक्षाचं भविष्य नाही, त्या पक्षात आपलं भविष्य काय होणार. जिंकण्याचं जिद्द नाही, पक्ष पुढे नेण्याची पक्ष नेतृत्वालाच इच्छा नाही तिथे थांबून मी करणार काय, असा सवाल करत अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचं कारण सांगितलं. काँग्रेसच्या आजच्या परिस्थितीसाठी विद्यमान नेतृत्वच जबाबदार आहे. नाना पटोलेंसारखे थोर विद्वान जर पक्ष चालवत असतील तर त्या पक्षाचे काय होणार,असा प्रश्नही अशोक चव्हाणांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे, पवारांचा दबाव
नाना पटोले सगळं स्वःताच्या इच्छेनुसार करतात.कोणाला ही विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात. वर्षा गायकवाड मुंबई अध्यक्षा आहेत, पण त्यांना न विचारता मुंबईच्या जागांचे वाटप झाले, आणि उमेदवारही घोषित झाले. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या दबावाखाली कांग्रेस नेते झुकले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाला ज्या जागा हव्या होत्,या त्या घेतल्या आणि जे उरलं सुरलं आहे ते कांग्रेसला मिळालं. राज्य नेतृत्वाने याबाबत काहीच केलं नाही.मी जर कांग्रेसमध्ये असतो तर हे होऊच दिलं नसतं, असेही चव्हाण यांनी म्हटले.
नाना पटोलेंवर हल्लाबोल
नाना पटोले व काँग्रेस नेते माझ्यावर आरोप करतात की, जागावटापाची बोलणी केल्यानंतर अशोक चव्हाणांनी पक्ष सोडला. त्यामुळे, कांग्रेसला नुकसान झालं. महाविकास आघाडीत मी सुरुवातीची चर्चा निश्चित केली, पण मला जे दिसलं त्याला पाहताच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असं राजकारणही चव्हाण यांनी पक्ष सोडण्याचबाबत सांगितलं. तसेच, मी निघालो तर नाना पटोले आणि इतर नेत्यांनी उद्धव ठाकरे, पवार यांच्यासमोर हिंमत दाखवत जागा मागून का घेतल्या नाहीत.स्वःताच्या अपयशाचं खापर दुसऱ्यांवर फोडायची यांची जुनी सवय आहे,असे म्हणत अशोक चव्हाण यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले.
आदर्श काँग्रेस काळातच झालेलं
उद्धव ठाकरे यांच्याकडे काही बोलायला नाही म्हणून ते अशी टीका करत आहेत.आदर्श एक संपलेला विषय आहे. त्यासोबत भाजपला जोडणे चुकीचं असून आदर्श हा विषय काँग्रेसच्या काळात झाला, मग त्यात भाजपचा काय संबंध असा सवालही चव्हाण यांनी विचारला आहे.तर, काँग्रेस सरकार असताना हे सगळं झालं. त्यामुळे, काय खरं काय खोटं हे काँग्रेसनेच सांगावं, असेही चव्हाण यांनी केली.
मुलगीही राजकारणात आली
राहूल गांधी यांनी माझ्याबद्दल केलेलं विधान पूर्णपणे खोटं आहे. मी कधीच सोनिया गांधींसमोर गेलो नाही, आणि रडलोही नाही. आता भविष्य भाजपसोबत आहे, भाजपला पुढे नेण्याचं काम मी करणार मी काही मिळेल यासाठी नाही गेलो पण जी जबाबदारी पक्ष नेतृत्व देईल ती स्वीकारुन काम करणार आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले. माझी मुलगी राजकरणात नुकतीच आली आहे, ती आता सगळं बघतेय, शिकतेय. तिला पक्ष काय जबाबदारी देईल बे माहित नाही. पण, आपण काम करत राहायचं हेच आमचं धोरण असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं.