मुंबई : सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या हंगामात सातारा (Satara) आणि कोल्हापूर (Kolhapur) या दोन जागांची चांगलीच चर्चा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याच्या सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आजही या दोन लोकसभा मतदारसंघांना तेवढेच महत्त्व आहे. दरम्यान, याच दोन्ही जागांवर उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिलीय. 


80 टक्के काम पूर्ण, लवकरच जागावाटप पूर्ण होणार 


आमचं 80 टक्के काम पूर्ण झालं असून 20 टक्के काम बाकी आहे. आज किंवा उद्या ते पूर्ण होईल. त्यानंतर तीन पक्षांतील जागावाटप पूर्ण केलं जाईल. भाजपच्या वाट्याला आलेल्या जागा आणि अपेक्षित जागा याची माहिती आम्ही आमच्या केंद्रीय निवडणूक समितीला दिलेली आहे. आमच्या फार जागा घोषित होणं बाकी नाही. तीन पक्षांतील जागावाटप हाच मुद्दा आमच्यासमोर आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली.


उदयनराजेंना बिनविरोध निवडून देणार का?


महाविकास आघाडीने कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शाहू महाराज यांचा सन्मान राखला जावा, असं अनेकांना वाटतं, याबाबत तुमचं मत काय? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, समजा साताऱ्यात महायुतीने उदयनराजे यांना तिकीट दिलं तर महाविकास आघाडी त्यांना बिनविरोध निवडून देणार आहे का? तसं असेल तर त्यांनी याबाबतची घोषणा करावी. उदयनराजे यांचाही तेवढाच सन्मान आहे.  हे राजकारण आहे. याआधीही राजघराण्यातील व्यक्तींनी निवडणुका लढवलेल्या आहेत. राजकारणात अशा मागण्या होत असतात, असे फडणवीस म्हणाले. 


उदयनाराजेंबाबत अमित शाह अंतिम निर्णय घेणार


सातारा मतदारसंघाचे लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळावे म्हणून उदयनराजे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी सध्या ते दिल्लीत आहेत. अमित शाह यांची भेट घेऊन ते आपल्या उमेदवारीवर चर्चा करणार आहेत. भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून त्यांच्या नावाला विरोध आहे. त्यामुळेच उदयनराजे यांना तिकीट मिळण्यास अडचणी येत आहेत. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. उदयनराजे आज गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहेत. उदयनराजे त्यांचं मत अमित शाह यांच्यासमोर मांडतील. त्यानंतर अमित शाह हेच अंतिम निर्णय घेतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 


हेही वाचा


Supriya Sule : टाळ्या, घोषणा अन् 3 लाखांची लीड, इंदापुरात सुप्रिया सुळेंनी सभा गाजवली; विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार?


Kedar Dighe : कल्याणमधून केदार दिघे दंड थोपटणार, उद्धव ठाकरेंच्या डावावर श्रीकांत शिंदेंचं थेट उत्तर; कोण बाजी मारणार?