Amit Shah-Eknath Shinde Meeting In Delhi: महाराष्ट्रात ते थांबवा, फडणवीसांना वादळ रोखता येणार नाही; एकनाथ शिंदे अमित शाहांना काय म्हणाले?, सामनामधून खळबळजनक दावा
Amit Shah & Eknath Shinde Meeting In Delhi: अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोणती राजकीय खलबते झाली, याबाबत आजच्या (13 जुलै) शिवसेनेचं मुखपृष्ठ असणाऱ्या सामनाच्या रोखठोकमध्ये खळबळजनक दावा केला आहे.

Amit Shah & Eknath Shinde Meeting In Delhi: राज्यात मराठीच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले असताना आणि विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे 9 जुलै रोजी संध्याकाळी अचानक दिल्लीत गेले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या.
दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी अनेक वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अमित शाह (Amit Shah) यांचीही एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती. यावेळी अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोणती राजकीय खलबते झाली, याबाबत आजच्या (13 जुलै) शिवसेनेचं मुखपृष्ठ असणाऱ्या सामनाच्या रोखठोकमध्ये खळबळजनक दावा केला आहे.
एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात काय घडलं?
मराठी माणूस व त्याचे सर्व प्रश्न जेथच्या तेथेच आहेत. हिंदी सक्तीविरोधात दोन ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही. ती युती होणे गरजेचे आहे. तरच महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मराठी एकजुटीचे वादळ निर्माण झाले ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हादरले आहेत. ही युती घडू नये यासाठी ते प्रयत्न करतील, असं रोखठोकमध्ये म्हटलं आहे. मराठी एकजुटीच्या विजय मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला विजेचे जोरदार धक्के बसले आहेत. त्याचे रूपांतर भूकंपाच्या जोरदार धक्क्यात होईल व आपले राज्य पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल याची सगळ्यांत जास्त भीती एकनाथ शिंदे व त्यांच्या बरोबरच्या लोकांना वाटते. ते बरोबर आहे. एकनाथ शिंदे हे चिंताग्रस्त होउढन लगेच दिल्लीत गेले. त्यांचे गुरू अमित शहांना भेटले. “महाराष्ट्रात सध्या जे घडते आहे ते थांबवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे वादळ रोखता येणार नाही.” यावर अमित शहा यांनी विचारले, “काय करायचे?” त्यावर शिंदे म्हणाले, “मी माझ्या लोकांसह भाजपमध्ये येतो. मला मुख्यमंत्री करा. हे सर्व रोखण्याची गारंटी देतो.” शहा – शिंदे यांच्यात ही चर्चा झाली व अशी चर्चा झाल्याची चर्चा शिंदे गटात सुरू आहे, असा दावा सामनाच्या रोखठोकद्वारे केला आहे.
महायुतीमधील वाद टाळा; शाहांचा शिंदेंना सल्ला-
गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीमधील अंतर्गत वादाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याबाबतही दिल्लीत अमित शाह आणि शिंदेंच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. शिंदे गटाच्या काही आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गदारोळ झाला होता. याबाबत भाजपने दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती. त्यामुळे अमित शाह यांनी, महापालिका निवडणुकीपर्यंत हे प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्या. महायुती एकसंध आहे, हा संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे, अशी सूचना एकनाथ शिंदे यांना केल्याचे समजते.

























