बारामती: आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार पडला तर देशाच्या राजकारणातील माझी किंमत कमी होईल. त्यामुळे निवडणुकीला मतदान करताना भावनिकपणे विचार करु नका. भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. कामं ही तडफेनेच करावी लागतात, जोरकसपणे करावी लागतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. विधानसभा निवडणुकीत तुम्ही मला विक्रमी मतांनी निवडून दिले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून लीड मिळालं पाहिजे, अशा शब्दांत अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती लोकसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. 


अजित पवार यांनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवरुन शरद पवार गटाच्या नेत्यांना लक्ष्य केले. तसेच आगामी काळात बारामतीचा विकास करायचा असेल तर महायुतीचा उमेदवार निवडून येणे, कसे महत्त्वाचे आहे, पटवून देण्याचा प्रयत्न मतदारांना केला. आपण नुसते सेल्फी काढत फिरत नाही. कामे करण्याचा आपल्याला आवाका आहे.   मी आणि माझा परिवार सोडला तर बारामतीमध्ये सगळेजण माझ्याविरोधात प्रचार करतील. इतरांसाठी एवढं करून मला एकटे पडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशावेळी मला तुम्हा कार्यकर्त्यांची साथच आहे. तुमची साथ आहे तोपर्यंतच मी तडफेने काम करु शकतो, असे भावनिक आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले.


पार्लामेंटमध्ये नुसती भाषणं करुन कामं होत नाहीत, अजितदादांचा सुप्रिया सुळे यांना टोला


अजित पवार यांनी आपल्या भाषणातून बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. अजित पवार यांनी म्हटले की, पार्लामेंटमध्ये नुसती भाषण करुन प्रश्न सुटत नाही. मीदेखील भाषणं करुन उत्तम संसदपटू म्हणून पुरस्कार मिळवला असता आणि इथे कामं केली नसती तर बारामतीमध्ये कामं होऊ शकली असती का, असा सवाल अजित पवारांनी विचारला. काही जण सांगतील वर आम्हाला द्या, खालची निवडणूक आहे त्यांना मतं द्या. पण माझ्या उमेदवाराला डाग लागला तर राज्यात आणि देशाच्या राजकारणात माझी किंमत कमी होईल, असे अजित पवार यांनी सांगितले.


अजित पवार की गॅरंटी


यावेळी अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या स्टाईलमध्ये एक आश्वासन दिले. बारामती लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी निवडून गेलेल्या खासदारापेक्षा नवा खासदार जास्त काम करेल. हा अजित पवारांचा शब्द आहे, हे जनतेला सांगा, अशी सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली. मोदी की गॅरंटी या धर्तीवर अजित पवारांनी दिलेली ही गॅरंटी चर्चेचा विषय ठरली. 



भाजपच्या स्टाईलमध्ये निवडणुकीचं व्यवस्थापन


अजित पवार यांनी आपल्या संपूर्ण भाषणात अनेकदा कार्यकर्त्यांना झटून काम करण्याचे आवाहन केले. यावेळी अजित पवार वारंवार बुथप्रमुख, पन्नाप्रमुख कशाप्रकारे महत्त्वाचे आहेत, हे सांगत होते. लोकसभेच्या उमेदवाराला सगळीकडे फिरता येत नाही. त्यामुळे बुथप्रमुख आणि पन्नाप्रमुख यांनी पक्षाची भूमिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे अजित पवार यांनी सांगितले. देशात २०१४ पासून अमित शाह यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने बुथप्रमुख आणि पन्नाप्रमुखांच्या माध्यमातून निवडणुकीचे प्रभावीपणे व्यवस्थापन केले होते. आता भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवार यांनीही भाजपच्या या रणनीतीचा अवलंब सुरु केल्याचे त्यांच्या भाषणातून दिसून आले.


आणखी वाचा


शरद पवारांनी उमेदवारी जाहीर करुनही अमोल कोल्हे अजित पवार गटात येणार, अजित दादांच्या विश्वासू नेत्याचा मोठा दावा