Ulhasnagar Firing News Update : उल्हासनगरमधील भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) गोळीबार प्रकरणात जखमी झालेले शिवसेनेचे कल्याण विभाग शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) आणि त्याचे सहकारी राहुल पाटील (Rahul Patil) यांना तब्बल 13 दिवसांनंतर आज ज्युपिटर रुग्णालयातून दुपारनंतर डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे. महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. टायगर इज बॅक, भावी आमदार आशयाचे बॅनर दिसत आहेत.


3 दिवसानंतर महेश गायकवाडांना रुग्णालयातून डिस्चार्ज


भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीचा वादातून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्या. गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे महेश गायकवाड यांच्या दीर्घायुष्यासाठी समर्थकांकडून होम हवन, मंत्र जप केले जात होते. तब्बल 13 दिवसानंतर महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास महेश गायकवाड हे कल्याणमध्ये दाखल होतील. यावेळी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. 


महेश गायकवाड पत्रकारांशी संवाद साधणार


महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात जागोजागी बॅनर लावण्यात आले आहेत. टायगर इज बॅक, भावी आमदार या आशयाचे बॅनर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत. तर साडेपाच वाजता महेश गायकवाड हे आपल्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. या घटनेनंतर महेश गायकवाड पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधणार असल्याने महेश गायकवाड काय बोलणार याकडे आता सर्वांचच लक्ष लागलं आहे.


जमिनीच्या वादावरून गोळीबार


उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड यांनी शुक्रवार 2 फेब्रुवारीला महेश गायकवाड आणि सहकारी राहुल पाटील यांच्यावर जमिनीच्या वादावरून एकूण 10 गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी महेश गायकवाड यांच्यावर 6 गोळ्या तर राहुल पाटील यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या होत्या. त्यामुळे दोघांना तातडीने उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलविण्यात आलं होतं.


ठाणे आणि कल्याण-डोंबिवली शक्तीप्रदर्शन


महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना ज्युपिटर रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर दोघाच्या समनार्थ मोठ्या संख्येने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या ठिकाणाहून शक्ती प्रदर्शन करण्यात येईल. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त देखील असणार आहे. दोघांना त्यांचे समर्थक आणि शिवसैनिक भेटण्यासाठी जागोजागी एकच गर्दी करतील.


गणपत गायकवाड यांच्यासह 5 जणांना न्यायालयीन कोठडी


या गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड यांच्यासह 5 जणांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी उल्हासनगर चोपडा कोर्टाकडून देण्यात आलेली आहे. सध्या सर्व आरोपीना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तळोजा कारागृहात हलविण्यात आलं आहे. या प्रकरणामुळे येणाऱ्या काळात कल्याण - डोंबिवली मतदार संघात शिवसेना आणि भाजप असा आमना सामना पाहायला मिळणार आहे. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह इतर नेते मंडळी यांनी देखील उपचारादरम्यान भेटून गेले होते.