Lok Sabha Election 2024 : मुंबई : लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजण्यापूर्वीच राज्यात प्रत्येक पक्षानं आपापले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रक्षप्रवेशांचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबतच आमदार, खासदारही मूळ पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच प्रत्येक पक्षाकडून अनेक मोठ-मोठे दावे केले जात आहेत. अजित दादांच्या (Ajit Pawar Group) गटातील एका मोठ्या मंत्र्यानं केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ पसरली आहे. शरद पवार गटाचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची शरद पवार गटानं उमेदवारी जाहीर केली असली, तरी ते कधीही अजित पवार गटात येऊ शकतात, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मंत्री धर्मबाबा आत्राम (Dharma Baba Atram) यांनी दिले आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (अजित पवार गट) आणि मंत्री धर्मबाबा आत्राम यांनी माहिती दिली की, "शरद पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. असं असलं तरीसुद्धा ते कधीपण अजित पवार गटात येऊ शकतात." पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, जिथे विद्यमान चार खासदार आमच्या पक्षाचे आहेत, त्या चार जागा आम्ही लढणारच आहोत. यासह भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या विदर्भातील जागांसह 9 जागांवर अजित पवार गटाचा दावा असल्याचं धर्माबाब अत्राम यांनी सांगितलं आहे.


शरद पवार यांनी आता आराम करून मार्गदर्शकांच्या भूमिकेत राहावं, असा सल्लाही धर्माबाबा अत्राम यांनी दिला आहे. महाराष्ट्रात शरद पवारांपेक्षा अजित पवारांचा चेहरा मोठा आहे. त्यामुळे शरद पवार यांना सहानभूती मिळणार नसल्याचं धर्माबाबा अत्राम म्हणाले आहेत.


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिस अहमदही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर 


विदर्भातलं मोठं नाव आणि काँग्रेसचे निष्ठावंत असलेले जेष्ठ नेते आणि माजी मंत्री अनिस अहमद लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसमधील मोठं नाव असलेले अनिस अहमद यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मंत्री अनिस अहमद यांचा काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणं म्हणजे, विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का असल्याचं बोललं जातं आहे.