बारामती: राजकारणात प्रत्येकाचा एक काळ असतो. बारामती लोकसभा निवडणूक ही भावकीची नाही. त्यामुळे या निवडणुकीकडे भावनिक होऊन पाहू नका, असे वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. ते सोमवारी बारामतीच्या तांबे नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या माजी सैनिकांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी देशाला पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्त्वाची गरज असल्याचे सांगितले.
140 कोटी जनतेचा नेता हा खमका असला पाहिजे. आमचा नेता नरेंद्र मोदी आहेत. आम्ही सांगतोय की मोदी पंतप्रधान होणार, आमच्या विरोधकांनी कोण पंतप्रधान होणार हे सांगावं. बारामतीचा आमदार विकासाच्या बाबतीत कमी पडला आहे का? केंद्राचा निधी मोठा मिळत असतो. परंतु दुर्दैवाने गेल्या काही वर्षात राज्यात केंद्राचा निधीच आला नाही. विकासासाठी निधी देण्याची धमक अजित पवारांमध्ये आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
बारामतीमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, अजित पवार म्हणाले...
बारामतीमधील लाटे परिसरात एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. तसेच अलीकडेच बारामतीमध्ये एका दाम्पत्याचा खून झाला होता. या घटनेबाबत अजित पवार यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, पोलिसांकडून बारामतीमधील खूनाच्या घटनेचा तपास सुरु आहे. हा तपास पूर्ण झाला की, मी तुम्हाला ही घटना कशामुळे घडली, हे सांगेन, असे अजितदादांनी म्हटले. तर लाटे येथील शेतकऱ्याच्या आत्महत्येचीही पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
निवडणुकीनंतर तुमच्यासाठी अजित पवारच आहे, बाकी सगळे 7 तारखेपर्यंतच येतील: अजित पवार
या भाषणात अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार गटाला लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, सध्या तुम्हाला अनेकजण भेटायला येतील. जे कधी भेटले नव्हते तेदेखील भेटायला येतील. हे सगळे तुम्हाला फक्त 7 तारखेपर्यंत येतील. परत तुम्हाला भेटायला अजित पवारच आहे. मीच तुमची कामं करणार, बाकीचे राजकारण करत आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले.
भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत. बारामतीच्या आताच्या खासदारांना तीन वेळा निवडून दिले. पण आता तुम्ही मी जो म्हणतो त्या खासदाराला निवडून द्या. देशाचे भवितव्य कुणाच्या हातात चांगले राहू शकते? ज्या लोकांना वेळ असताना देखील ते मंत्री झाले नाहीत. मंत्री असताना आपण काम करू शकलो असतो. स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती उमेदवार म्हणून दिला आहे. मी सांगतो तसे तुम्ही केलेत तर बारामतीचा विकास झपाट्याने करून दाखवतो, असेही अजित पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा
मुलगा पार्थचा पराभव करणाऱ्या श्रीरंग बारणेंसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मैदानात उतरले