Ajit Pawar : ज्या पवार कुटुंबीयांनी पराभव कधी पाहिलाच नाही, त्या पवार कुटुंबीयांमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये दारुण पराभव झाला होता. हा पराभव तेव्हा एकसंध शिवसेनेतील श्रीरंग बारणे यांनी केला होता. त्यामुळे हा पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी चांगलाच लागला होता. इतकंच नव्हे तर या पराभवासाठी कारणीभूत असणाऱ्या नेत्यांना सुद्धा पाडण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली होती. मात्र, आता गेल्या पाच वर्षांमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. त्यामुळे राजकारणामध्ये सुद्धा बरेच बदल झाले आहेत. आता शिवसेना फुटली गेली आहे तसेच राष्ट्रवादी सुद्धा फुटली गेली आहे.
फुटलेले दोन्ही गट भाजपच्या वळचणीला गेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राजकारणातील समीकरणे बदलून गेली आहेत. त्यामुळे ज्यांनी पराभव केला, त्यांच्या विजयासाठीच उतरण्याची वेळ आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे 2019 मध्ये ज्या विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थचा पराभव केला होता त्यांच्यासाठीच आता प्रचारासाठी मैदानात उतरावं लागलं आहे. आज (8 एप्रिल) मावळ लोकसभेमध्ये महायुतीच्या समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः उपस्थित राहणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या