सिंधुदुर्ग: राज्यातील महायुतीचे बहुतांश उमेदवार ठरले असले तरी सिंधुदु्र्ग-रत्नागिरीची (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha constituency)  जागा कुणाची आणि उमेदवार कोण असेल यावर मात्र अद्याप अंतिम निर्णय होत नाही. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत (Kiran Samant) उमेदवारीसाठी फिल्डिंग लावत असताना दुसरीकडे नारायण राणेंना (Narayan Rane)  प्रचाराचा धडाका सुरू केल्याचं दिसतंय. अशात आता सेनेच्याच दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) नारायण राणेंना (Narayan Rane) मतदान करा असं आवाहन केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. 


राणेच संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता


रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नसला तरी प्रचाराचा धडाका मात्र जोरात सुरू आहे. सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडून द्या असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मतदारांना आवाहन केलंय. त्यामुळे नारायण राणेंच संभाव्य उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तशा प्रकारचा प्रचार देखील केला जातं आहे. 


दीपक केसरकर यांनी विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यावर मात्र सडकून टीका केली आहे. सध्याचे खासदार दोन वेळा इथून निवडून आले, मात्र ते साधे राज्यमंत्रीही होऊ शकले नाहीत. त्यामुळे नारायण राणे यांना  निवडून देऊन मोदींच्या मंत्रिमंडळात पाठवा, यासाठी जोमानं काम करा असं आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी केलं.


या आधीही दीपक केसरकरांनी किरण सामंत यांना तिकीट मिळेल की नाही हे सांगता येणार नाही असं वक्तव्य केलं होतं. आतातर त्यांनी थेट राणेंना मतदान करण्याचं आवाहन केल्यामुळे नारायण राणेंचं नाव अंतिम झाल्याची चर्चा आहे. 


महायुतीमध्ये उमेदवारीवरून संभ्रम, दोन दिवसात अंतिम निर्णय


महायुतीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवरून अद्यापही संभ्रम कायम आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे तिकीटासाठी नेत्यांच्या भेटीगाठी घेत असताना दुसरीकडे भाजपच्या नारायण राणेंनी मात्र प्रचार सुरू केल्याचं दिसतंय. 


रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर दोन्ही बाजूंनी दावा केला जात आहे, तसेच एकमेकांच्या विरोधात वक्तव्यं केली जात आहेत. त्याची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे आणि किरण सामंत यांना शांत बसण्याची तंबी दिल्याची माहिती आहे. या जागेच्या उमेदवारीचा फैसला आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे येत्या दोन दिवसात घेणार असल्याची माहिती आहे. 


ही बातमी वाचा: