Ajit Pawar News : तातडीने मुंबईला येण्यासाठी सरकारी विमान का? अजित पवारांनी कारण सांगितलं
Ajit Pawar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सरकारी विमानाने मुंबईला जाण्यास सूचवलं आणि त्यासाठी विमान उपलब्ध करुन दिल्याचं अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
Ajit Pawar News : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना तातडीने नागपुरातून (Nagpur) मुंबईला (Mumbai) येण्यासाठी सरकारने विमान उपलब्ध करुन दिलं. त्यावर आता अजित पवार यांनी स्पष्ट माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सरकारी विमानाने मुंबईला जाण्यास सूचवलं आणि त्यासाठी विमान उपलब्ध करुन दिल्याचं अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. सध्या अजित पवार हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात (Nagpur winter session) आहेत. परंतु राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आज मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून सुटका होणार आहे. त्यांची भेट घेण्यासाठी अजित पवार मुंबईत येणार आहेत.
शासनाचं विमान कोणी वापरावं याचा सर्वस्वी अधिकार राज्याच्या प्रमुखांचा : अजित पवार
शिंदे फडणवीस सरकारने अजित पवारांना तातडीच्या प्रवासासाठी सरकारी विमान उपलब्ध करुन देण्यामागचं कारण अजित पवार यांनी सांगितलं. अजित पवार म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांची आज सुटका होणार आहे. त्यांना मुंबईबाहेर कुठेही जाता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सांगलीहून मुंबईत येण्यास सांगितलं. माझा देखील मुंबईला जाण्याचा प्रयत्न आहे. हे सगळं होत असताना काल मला शिंदे साहेबांनी उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक घेत असल्याचं सांगितलं. उद्याऐवजी परवा बैठक घेतली तर बरं पडेल, असं मी त्यांना म्हटलं. कारण मी अकरा वाजताच निघणार होतो. तर त्यांनी सांगितलं की दहा वाजता कामकाज सल्लागार समितीची बैठक लावतो. तुम्हाला मी शासनाचं विमान उपलब्ध करुन देतो. त्यातून तुम्ही जा आणि काय काम आहे ते करुन परत या. त्यामुळे मी माझा कार्यक्रम बदलला. दिलीप वळसे पाटील आणि मी दुपारी एक वाजता शासनाच्या विमानाने मुंबईला जाणार आहोत. शासनाचं विमान कोणी वापरावं हा सर्वस्वी अधिकार हा राज्याच्या प्रमुखांचा असतो. मी पण विरोधी पक्षनेता आहे. मलाही कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. आम्ही देखील सत्तेत असताना कधी काही प्रसंग आला तर एकमेकांना सहकार्य करायचो. त्यामुळे कदाचित मी दुपारी एक वाजता शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या विमानाने मुंबईत जाण्याचं आणि त्याच विमानाने परत येण्याचं माझं नियोजन आहे.
अनिल देशमुख यांची आज तुरुंगातून सुटका
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येणार आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी अनिल देशमुखांची सुटका होणार आहे. त्यांच्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची (CBI) मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यानंतर देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
संबंधित बातमी
शिंदे-फडणवीस सरकारकडून तातडीची मदत, अजित पवारांना मुंबईत येण्यासाठी सरकारी विमान