अजित पवारांचं ठरलं, राष्ट्रवादी जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा लढणार; 37 मतदारसंघात आढावा
तळागाळातील कार्यकर्त्यांना सशक्त करणे हा पक्षाचा उद्देश आहे. यावेळी ब्रिजमोहन श्रीवास्तव वैयक्तिकरित्या जिल्हा अधिकारी, कार्यकर्ते आणि विशेषत: बूथ प्रभारी यांच्याशी चर्चा करतील
श्रीनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा (Vidhansabha) निवडणुक लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू- काश्मीरमध्ये (Jammu and kashmir) निवडणूकपूर्व हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य समितीने पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांचा दौरा जाहीर केला आहे. राष्ट्रीय सरचिटणीस जम्मू-काश्मीर विभागाच्या 8 दिवसांच्या या दौऱ्यात पक्ष कार्यकर्त्यांना सक्रीय करणार असून पक्षाच्या योजना आणि जम्मू-काश्मीरच्या विकासाबाबत माहिती देणार असल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष डॉ. तारिक रसूल यांनी दिली. त्यामुळे, अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्त्वात आता राष्ट्रवादी काश्मीर खोऱ्यातही झेंडा रोवण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते.
तळागाळातील कार्यकर्त्यांना सशक्त करणे हा पक्षाचा उद्देश आहे. यावेळी ब्रिजमोहन श्रीवास्तव वैयक्तिकरित्या जिल्हा अधिकारी, कार्यकर्ते आणि विशेषत: बूथ प्रभारी यांच्याशी चर्चा करतील आणि या बैठकींमुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत होईल, ज्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे तळागाळातील योद्धे तयार होतील असा विश्वास व्यक्त करतानाच पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद संघटनेचा पाया मजबूत करतो, ज्यामुळे पक्षाची वाटचाल निवडणुकीत विजयाकडे होते, म्हणूनच पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सक्षम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे तारीक रसूल यांनी सांगितले. ब्रिजमोहन श्रीवास्तव हे राष्ट्रीय प्रवक्ता असल्याने त्यांना प्रसारमाध्यमांचे महत्त्व कळते आणि पत्रकारितेचे सामर्थ्य त्यांना कळते, त्यामुळे ते स्थानिक पत्रकार, पत्रकार प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांच्या भेटी घेणार आहेत.
आमचा पक्ष जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि पक्षाचा दृष्टिकोन स्पष्ट करण्याला जास्त महत्त्व देतो असा आत्मविश्वास व्यक्त करतानाच डॉ. तारिक रसूल यांनी श्रीवास्तव यांना जम्मू - काश्मीरमधील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तिथल्या वास्तविकतेला सामोरे जायचे आहे असे सांगितले. ब्रिजमोहन श्रीवास्तव हे 12 जुलै रोजी श्रीनगरला पोहोचतील आणि 19 जुलै 2024 रोजी परततील, या दरम्यान ते 8 जिल्हे आणि सुमारे 37 मतदारसंघामधील कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. ब्रिजमोहन श्रीवास्तव हे जम्मू-काश्मीरमध्ये पक्षाचे भविष्य मजबूत करतील, असा विश्वासही तारिक रसूल यांनी व्यक्त केला.
आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल पटेल यांची जनतेच्या सेवेसाठी बांधिलकी आहे.आमचा राजकीय प्रवास हा पदांसाठी नसून आम्ही प्रतिनिधित्व करत असलेल्या लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आहे. आमची कृती ही आमच्या शब्दांपेक्षा कामाकडे जास्त असली पाहिजे आणि आमचे समर्पण हे देशाला पुढे नेणारे दीपस्तंभ असले पाहिजे आणि म्हणूनच आमच्या नेत्यांच्या भावनेनुसार जम्मू-काश्मीरमधील आमच्या पक्ष कार्यकर्त्यांना तयार करण्यासाठी मी प्रयत्न करेन, अशी माहिती ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिली.
महाराष्ट्रासोबतच काश्मीरमध्येही निवडणुका?
दरम्यान, जम्मू-कश्मीरमध्ये 2018 पासून विधानसभा अस्तित्वात नाही. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या निवडणुका सप्टेंबरपर्यंत घेण्यात याव्यात, असा आदेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागले असून जम्मू-काश्मीर बरोबरच महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांच्याही निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता आहे. यंदा जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रवादीही तयारीनीशी निवडणुकांच्या मैदानात उतरणार आहे.