पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर मतदारसंघासाठी लागणाऱ्या निधीचे गणित लक्षात घेऊन अजित पवार यांच्यासोबत जाणारे पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके हे गुरुवारी पुन्हा शरद पवार यांच्या गोटात सामील झाले आहेत. निलेश लंके यांनी पुण्यातील पक्षकार्यालयात शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यानंतर पक्षप्रवेशानंतर रितसर पत्रकारपरिषद होते, तीदेखील पार पाडली. परंतु, या सगळ्यानंतर निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी शरद पवार गटात प्रवेशच केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अर्थात त्याला कारणही तसेच आहे. गेल्या काही काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि अजितदादा गटाने अदृश्य शक्तीच्या मदतीने एकाहून एक सरस कायदेशीर डावपेच खेळत अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून त्यांचे पक्ष हिसकावून घेतले होते. मात्र, आज शरद पवार यांनी या सगळ्याची सव्याज परतफेड केली. अजितदादा गटाकडून आजपर्यंत खेळण्यात आलेल्या कायदेशीर डावपेचांना शरद पवार यांनी त्याच भाषेत उत्तर दिले. 


अखेर निलेश लंके पवारांच्या राष्ट्रवादीत डेरेदाखल, मात्र वसंत मोरे प्रवेश न करताच माघारी, कारण काय?


नेमकं काय घडलं?


निलेश लंके हे आज शरद पवारांना भेटले असले तरी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये अधिकृतरित्या पक्षप्रवेश झालेला नाही. लंके यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला असता तर अजित पवारांनी पक्षांतर बंदी कायद्याचा आधार घेत कारवाई त्यांच्यावर कारवाई केली असती. तसे झाले असते तर पुढील सहा वर्ष निवडणूक लढविण्यास अडचण येऊ शकते.  हे ध्यानात घेऊन निलेश लंके यांच पक्षप्रवेश लांबणीवर टाकण्यात आला. आगामी काळात कदाचित आमदारकीचा राजीनामा देऊन ते   अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करतील.  आजच्या पत्रकार परिषदेत निलेश लंके, जयंत पाटील आणि शरद पवार यापैकी कुणीही लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतायत असे म्हणालेल नाही. फक्त त्यांच्या हातात तुतारी हे चिन्ह देण्यात आले होते. त्यामुळे शरद पवार यांनी आपला हेतूही साध्य केला आणि निलेश लंके यांनाही पक्षांतरबंदीच्या कारवाईपासून वाचवले. ही खेळी खेळून शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपण आजही महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य असल्याचे दाखवून दिले आहे.


आणखी वाचा


वयाचा उल्लेख करताच शरद पवारांनी तात्काळ जयंत पाटलांना हटकले, म्हणाले, अययय!!!