दापोली: अमित शाह सध्या आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करतात. पण 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी अमित शाह यांनी मातोश्रीवर येऊन लोटांगण घातले होते. त्यावेळी अमित शाह यांना घराणेशाही दिसली नाही का, अस परखड सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला. काही दिवसांपूर्वी अमित शाह (Amit Shah) यांनी जळगाव येथील सभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लक्ष्य केले होते.  अमित शाहांच्या या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ते गुरुवारी दापोलीत आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. 


उद्धव ठाकरे यांनी आपल्य भाषणात अमित शाह यांच्यावर टीका करताना म्हटले की, 2014 आणि 2019 साली अमित शाह यांनी मातोश्रीवर येऊन लोटांगण घातले. त्यावेळी त्यांना घराणेशाही दिसली नाही का? मातोश्रीवर येऊन गेल्यानंतर अमित शाह यांनी घात केला, दिलेला शब्द मोडला. आमचं हिंदुत्त्व कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणारे नाही. परंतु, अमित शाह यांचं कामच पाठीत खंजीर खुपसणे हेच आहे. पण पाठीत खंजीर खुपसला की समोरच्याचा कोथळा बाहेर काढायचा, ही शिवाजी महाराजांची शिकवण आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.


भाजपने 'अबकी बार 400' पारचा नारा दिला आहे. भाजपकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेली घटना बदलण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यघटना बदलण्यासाठी त्यांना 400 चा आकडा पार करायचा आहे. ही लोकसभा निवडणूक मोदींच्या घशात गेली तर यापुढे निवडणुका होणार नाहीत. नरेंद्र मोदी हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याप्रमाणे काम करतील. मोदी पुन्हा सत्तेत आले तर हुकूमशाह होतील. मोदी-शाह यांच्या सरकारला भ्रष्टाचाराची चाकं आहेत, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 



अमित शाह घराणेशाहीवर काय म्हणाले होते?


अमित शाह यांनी देशातील प्रादेशिक पक्षांमध्ये घराणेशाही असल्याचे म्हटले होते. ज्या पक्षांमध्ये लोकशाही नाही ते घराणेशाही असणारे पक्ष आहेत. असे पक्ष देशात लोकशाही ठेवतील का, असा सवाल शाह यांनी उपस्थित केला होता. सोनिया गांधी यांना राहुल गांधींना (Rahul Gandhi) पंतप्रधान करायचे आहे. उद्धव ठाकरे यांना आदित्यला मुख्यमंत्री करायचे आहे. शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे, ममता बॅनर्जींना आपल्या भाच्याला मुख्यमंत्री करायचे आहे, स्टॅलिन यांना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचे आहे. मग या सगळ्यांपैकी तुमच्यासाठी कोण आहे? तुमच्यासाठी कोणी असेल तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत, असे अमित शाह यांनी म्हटले होते.


आणखी वाचा