BEST Election Result: बेस्टच्या निवडणुकीत दारुण पराभव होताच भाजप नेते ठाकरे बंधूंवर तुटून पडले, म्हणाले, 'दोन शून्यांची बेरीज...'
BEST Election Result: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर भाजप आमदार प्रसाद लाड अन् केशव उपाध्येंनी खिल्ली उडवली आहे.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र येऊन प्रतिष्ठेची झालेली बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (BEST Election २०२५) निवडणूक लढवली होती. या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल अखेर उशीरा रात्री जाहीर झाला. मात्र निकालाने ठाकरे बंधूंसाठी मोठा धक्का दिला आहे. उत्कर्ष पॅनेलला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीतील तब्बल ९ वर्षांची सत्ता गमावली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या राजकीय समीकरणांना हा पराभव मोठा धक्का मानला जातो. या पराभवानंतर आता भाजपने ठाकरे बंधूंना डिवचायला सुरूवात केली आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट करत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची खिल्ली उडवली आहे.
आज त्यांनाच त्यांची किंमत कळली - केशव उपाध्ये
केशव उपाध्ये यांनी आपल्या सोशल मिडीया पोस्टमध्ये म्हटलंय, 'एकाकडे गमावण्यासाठी काही राहिलेले नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काही राहिलेले नाही, अशा ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी त्या गणिताचे उत्तर शून्यच येते, हे शाळा न शिकलेल्या मुलांनाही माहीत असलेले उत्तर ओळखले नाही तर काय होईल?…या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ‘बेस्ट कामगार पतपेढी’च्या निवडणूक निकालाकडे पाहा! कालपर्यंत दोन शून्ये आपली किंमत जोखण्याचे आव्हान देत होती, आज त्यांनाच त्यांची किंमत कळली आहे!! #बेस्टपतपेढी_निवडणूक #उध्दवठाकरे #राजठाकरे'.
एकाकडे गमावण्यासाठी काही राहिलेले नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काही राहिलेले नाही, अशा ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी त्या गणिताचे उत्तर शून्यच येते, हे शाळा न शिकलेल्या मुलांनाही माहीत असलेले उत्तर ओळखले नाही तर काय होईल?…
— Keshav Upadhye (@keshavupadhye) August 20, 2025
या प्रश्नाचे उत्तर…
ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत- प्रसाद लाड
जागा दाखवली….बेस्ट इलेक्शनमध्ये " ठाकरे " ब्रँड २१ समोर ०००, ००/२१ म्हणजे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत... अशा शब्दात भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंनी डिवचलं आहे.
निकालाचे समीकरण
* एकूण जागा : २१
* शशांकराव पॅनेल : १४ जागा
* सहकार समृद्धी पॅनेल (प्रसाद लाड, नितेश राणे, किरण पावसकर): ७ जागा
* उत्कर्ष पॅनेल (राज ठाकरे – उद्धव ठाकरे) : ० जागा
ठाकरे बंधूंनी उत्कर्ष पॅनल या निवडणुकीत उतरवले होते. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची युती झाली होती. तर दुसरीकडे महायुतीने सुद्धा ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची भाजप प्रणित श्रमिक उत्कर्ष सभा, नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना तर शिंदेंच्या शिवसेनेचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्रित मिळून सहकार समृद्धी पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. तर बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांकराव पॅनल यांनी सुद्धा आपले २१ उमेदवार रिंगणात उतरवले होते.
























