(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abp Majha Impact: नांदेडमध्ये देहव्यापर करणाऱ्या महिलांच्या निधीत भ्रष्टाचार, फडणवीसांनी अधिवेशनात मांडला तारांकित प्रश्न
Nanded Sex Workers Relief Fund: काही दिवसांपूर्वी एबीपी माझाने नांदेड (Nanded) जिल्ह्यात देहव्यापर करणाऱ्या महिलांच्या निधीत भ्रष्टाचार झाल्याची बातमी प्रदर्शित केली होती.
Abp Majha Impact: काही दिवसांपूर्वी एबीपी माझाने नांदेड (Nanded) जिल्ह्यात देहव्यापर करणाऱ्या महिलांच्या निधीत भ्रष्टाचार झाल्याची बातमी प्रदर्शित केली होती. दरम्यान, याच बातमीचा दाखला देत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाचा उल्लेख करत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
कोरोनाच्या प्रादुर्भावाने रोजगार गेलेल्या, देहव्यापर करून उदरनिर्वाह करणार्या महिलांची कोविड कालावधीत उपासमार होऊ नये यासाठी शासनाने आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयांतर्गत देहव्यापर करणाऱ्या महिलांना दरमहा 5 हजार रुपये, तर ज्या महिलांची मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त 2 हजार 500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 51 कोटी 18 लाख 97 हजार 500 रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता.
या निर्णयानुसार, नांदेड जिल्ह्यासाठी 2 कोटी 81 लाख 65 हजार 500 रुपये निधी उपलब्ध झाला. तर या निधीपैकी 1 हजार 36 महिलांना व त्यांच्या 662 बालकांना 2 कोटी 4 लाख 90 हजार रुपये वाटप करण्यात आले, अशी माहिती जिल्हा व महिला बाल विकास अधिकार्यांनी दिली होती. मात्र सरकारने दिलेले अनुदान आपल्याला प्राप्त झालं नसल्याचे शहरातील आणि जिल्ह्यातील महिलांनी सांगितल्याची माहिती समोर आली. यातील काही महिलांना संबंधीत संस्थेने संपर्क साधला होता, परंतु बदनामीच्या भितीने कुठलेही कागदपत्र दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे अर्थ सहाय्य करताना कोणत्याही ओळखपत्राचा आग्राह न करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र नांदेडात ओळखपत्राची मागणी करण्यात आलीय. त्यामुळे बहुतांश महिलांना अनुदान मिळाले नाही. संबंधित संस्थेने प्रत्यक्ष काम करणार्या महिलांशी संपर्क न साधल्याने तब्बल दोन कोटी रुपये वाटप कुणास करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केल्या आहे. तर जवळपास दोनशेहून अधिक महिलांचे अनुदान लाभाचे अर्ज जिल्हा महिला व बाल कल्याण कार्यालय नांदेड यांच्याकडून भरून घेऊन सुद्धा संबंधित देहव्यापर करणाऱ्या महिलांना कोणतीही अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याची माहिती देहव्यापर करणाऱ्या महिलांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितलं होतं. त्यामुळे नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातही अशा प्रकारे बोगस वेश्या व्यवसाय करणारे लाभार्थी दाखवून राज्याच्या महिला व बालविकास विभागाने दिलेल्या ह्या निधीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे या निधी वाटपाची चौकशी करण्याची मागणी नांदेड जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
संबंधित बातमी: