World AIDS Day: दुर्धर आजाराने बाधित असलेल्यां बरोबर समाज आजही अंतर ठेवूनच वागतो. त्यातच HIV बधितांकडे पाहण्याकडे समाजाचा वेगळा दृष्टीकोण दिसून येतो. हाच दृष्टीकोन प्रशासकीय आणि सामाजिक पातळीवर बदलला पाहिजे, यासाठी परभणी जिल्हा प्रशासनाने सामाजिक संस्थांच्या मदतीने मोठी पावले टाकली आहेत. HIV बधितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सामाजिक संस्थांच्या सहकार्याने 2000 बाधितांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे. 


दोष नसताना साथीदाराच्या चुकीची शिक्षा भोगत असलेल्या आणि केवळ समाजातही नाही तर प्रशासकीय पातळीवरदेखील हीन वागणूक मिळणाऱ्या या HIV बाधितांना परभणी जिल्हा प्रशासनाने मोठा आधार दिला आहे. सामाजिक संस्थांच्या मदतीने जिल्ह्यातील 1683 बाधितांना संजय गांधी निराधार योजनेतून पगार तर 387 बालकांना 'माता बाल संगोपन योजने'चा लाभ एकाच वेळी दिला गेला आहे. यातून या सर्व बाधितांना दरमहा 20 लाख रुपये मिळणार आहेत. 


परभणी जिल्ह्यात एकूण 7000 HIV बाधित आहेत. दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्यांना महिन्याकाठी लागणारी औषधे तसेच उपजीविका भागवण्यासाठी पावलोपावली समाज आणि प्रशासकीय यंत्रणेशी संघर्ष करून जगावे लागत आहे. अनेकांना अजूनही दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. तसेच अनेकांचे आधार कार्ड देखील नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  


हीच बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी स्वतः विहान या सामाजिक संस्थेच्या मदतीने तीन महिन्यात विशेष शिबिराचे आयोजन केले. यामध्ये जवळपास 2000 एचआयव्ही बाधितांचे सर्व कागदपत्रे अत्यंत गोपनीय पद्धतीने तयार करून त्यांना शासकीय योजनेचा लाभ दिला आहे. एवढेच नाही तर जिल्हा रुग्णालयातील एआरटी सेंटर मध्येही प्रशासनाने सुसज्ज असा एक कक्ष उभारला असून जिथे बाधितांचे समुपदेशन, उपचार केले जात आहेत. 


जिल्हा प्रशासन आणि विहान या सामाजिक संघटनेने या सर्व बाधितांना आपलेसे करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न केले असून त्यात त्यांना यश मिळत असल्याचे चित्र आहे. एका बाधित महिलेला आणि तिच्या दोन्ही मुलींना कुटुंबाने सोडून दिले होते. उदरनिर्वाहासाठी कुणी कामही देत नव्हते. मात्र, आज ती महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली असून दोन्ही मुलींचे शिक्षण सुरू आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या: