World AIDS Day 2022 : अनेक लोक एचआयव्ही आणि एड्सचा एकमेकांसाठी वापर करत असतात, दोन्ही संज्ञा वेगवेगळ्या आहेत आणि त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे. ह्या जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने एड्स सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि संसर्गजन्य रोगांमधील एचआयव्ही संबंधी सल्लागार डॉ. ईश्वर गिलाडा यांनी एचआयव्हीचे एड्समध्ये रूपांतर होण्याच्या टप्प्यांबाबत सांगितलं आहे.  अलिकडेच नॅकोद्वारा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 2011 ते 2021 या कालावधीत 17 लाख लोकांना एचआयव्हीचा संसर्ग झाला. गेल्या काही वर्षांमध्ये एचआयव्हीचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होत चालले असले तरी, महाराष्ट्र हे सर्वात वरच्या क्रमांकावर असलेल्या राज्यांपैकी एक आहे, जेथे एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या सर्वाधिक असून २०११ ते २०२१ या कालावधीत एचआयव्ही बाधित लोकांची संख्या 2.8  लाख इतकी होती. त्यामुळे, ह्या विषाणूच्या संसर्गाविषयी आणि एचआयव्ही विषाणूच्या संसर्गाचे रूपांतर  एड्स मध्ये कसे होते याबद्दल जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. सर्वप्रथम, एचआयव्ही (ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस) हा एक विषाणू आहे जो माणसाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो, त्याची संसर्गग्रस्त रक्त, योनीतील द्रव किंवा वीर्याद्वारे लागण होते. उपचार न केल्यास, विषाणूचा संसर्ग पुढच्या टप्प्यात जातो, ज्याची साधारणपणे तीन टप्प्यांत विभागणी करता येते -


टप्पा १: तीव्र स्वरूपाचा एचआयव्ही संसर्ग
हा एचआयव्हीचा पहिला आणि प्रारंभिक टप्पा आहे, जो विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर ४ ते ८ आठवड्यात आत विकसित होतो. या अवस्थेत, हा विषाणू रोगप्रतिकारक पेशी नावाच्या संसर्गाशी लढणाऱ्या पेशींवर हल्ला करून त्यांचा नाश करतो. या टप्यात, एचआयव्हीच्या विषाणूंची रक्तातील आणि त्यानंतर मानवी शरीरातील अवयवातील त्यांची संख्या वेगाने वाढते.  त्यानंतर रुग्णाला ताप, फ्लू, घसा खवखवणे, मळमळ आणि डोकेदुखी इत्यादीसारखी सामान्य लक्षणे दिसू शकतात. या टप्याला सेरोकन्व्हर्सन कालावधी असे देखील म्हणतात, ज्यात शरीर विषाणूशी लढते आणि विषाणूच्या हल्ल्याचा नैसर्गिक प्रतिसाद दर्शवते. परंतु, बहुतेक संसर्ग झालेल्या व्यक्तींना काहीही लक्षात न येण्याची शक्यता असते किंवा काही अनुभव येत नाही.  त्यामुळे या टप्प्यात अनेक रूग्णांच्या बाबतीत निदान केले जात नाही. या अवस्थेत एचआयव्ही बाधित व्यक्ती अत्यंत संसर्गजन्य असते आणि त्यामुळे विषाणूचा पसार करण्याची शक्यता अधिक असते, त्याचे कारण त्या व्यक्तीला त्याला किंवा तिला संसर्ग झाला आहे हे माहीत नसते.


टप्पा २: एचआयव्हीचा तीव्र संसर्ग
हा दुसरा टप्पा आहे ज्यात माणसाच्या शरीरात, कमी वेगाने असले तरी सुद्धा, विषाणूच्या संख्येत अनेक पटीने वाढ होते. या टप्प्यात बहुतांश रुग्णांचे निदान होते. लवकर निदान न केल्यास आणि वेळेवर उपचार न केल्यास, हा विषाणू अनेक पटींनी वाढतो आणि रोगप्रतिकार प्रतिकार शक्तीला अधिक नुकसान पोहोचवतो. 


टप्पा ३: एक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम (एड्स)
हा एचआयव्हीचा शेवटचा आणि सर्वात प्रगत टप्पा आहे, ज्यामध्ये त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे नष्ट झालेली असते आणि विषाणूशी प्रभावीपणे लढण्यात अपयशी ठरते. या टप्प्यात, अनेकांना अधिक तीव्र स्वरूपाच्या संसर्गाचाशी लढा द्यावा लागू शकतो, ज्यात रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होण्यामुळे माणसाच्या शरीरावर इतर संसर्ग आक्रमण करतात. या टप्प्यात, त्या व्यक्तीच्या शरीरात विषाणू प्रचंड प्रमाणात असतात आणि ती व्यक्ती इतर व्यक्तींना विषाणूचा अगदी सहज प्रसार करू शकते. 


लवकर निदान लागल्यास एचआयव्हीला प्रतिबंध करता येऊ शकतो. ‘चाचणी आणि उपचार’ ह्या धोरणाच्या आजच्या युगात एचआयव्हीवर त्वरित उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रभावी उपचार केल्यास, ज्यांना एचआयव्ही विषाणूचा संसर्ग झाला आहे अशा व्यक्ती ‘‘अन्डेक्टेबल = अन्ट्रान्समिटेबल’’ किंवा यू=यू हा मुद्दा समजून घेऊन, त्यांच्या लैंगिक साथीदाराला किंवा अपत्यांना संसर्गाचा प्रसार न करता, निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगू शकतात.