Parbhani : निवडणूक आयोगाकडे बोगस शपथपत्र? मुंबई क्राईम ब्रँचकडून प्रकरणाचा तपास
अनेक जणांच्या नावाने परस्पर बॉंड घेऊन बोगस सह्या मारल्याचा आरोप करण्यात येत असून परभणीचे माजी आमदार हरी भाऊ लहाने यांनी तशी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
परभणी : शिवसेना फुटल्यानंतर खरी शिवसेना कुणाची हे सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटाकडून शिवसेनिकांच्या नावाने शपथ पत्र देण्यात येत आहेत. मात्र या शपथपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ करण्यात येतोय का असा प्रश्न उपस्थित झालाय. कारण अनेक जणांच्या नावाने परस्पर 100 रुपयांचे बॉंड घेऊन त्यांच्या नावाच्या सह्याही परस्परच करून हे शपथपत्र देण्यात येत असल्याचं समोर येतंय. या प्रकरणाची चौकशी मुंबई क्राईम ब्रॅंचकडून सुरू आहे. परभणीच्या सेलूत ही असाच प्रकार झाल्याने तो थेट एकनाथ शिंदे गटाचेच माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आणून दिला.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दोन्ही गटाच्या स्थानिक नेत्यांकडून आपापल्या गटाचे सदस्य असल्याचे 100 रुपयांच्या बॉण्ड शपथपत्र घेण्यात आले. जे लाखोंच्या संख्येत होते आणि शपथपत्र घेऊन पक्षाकडे पाठवण्यात आले. दोन्ही पक्षांकडून हे शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले. मात्र यात कित्येक जणांच्या नावाने बॉण्ड विक्रेत्यांकडून कित्येक जणांच्या नावाने परस्परच बॉण्ड घेण्यात आले. शिवाय त्यांच्या नावाने शपथपत्र तयार करून सह्या पण परस्परच मारण्यात आल्या आणि तसेच शपथपत्र पक्षाकडे पाठवण्यात आले.
सेलुत 10 ते 15 जणांच्या नावे असेच परस्पर शपथपत्र देण्यात आले
परभणीच्या सेलू शिंदे गटाकडून जी शपथपत्र घेण्यात आले त्या शपथपत्रांमध्ये अनेकांच्या नावाने बॉंड विक्रेत्याकडून परस्परच बॉंड खरेदी करण्यात आले. त्यांच्या नावाने सह्याही परस्परच करण्यात आल्या आणि ते शपथपत्र पक्षाकडे पाठवण्यात आले. ही बाब जेव्हा या लोकांच्या लक्षात आली त्यावेळेला त्यांनी माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आणून दिली.
मुंबईतील क्राइम ब्रॅंच पथकाकडून या प्रकरणाचा सुरू आहे तपास
मुंबई क्राईम ब्रांच कडून राज्यात ज्या ज्या ठिकाणी असे झाले आहे त्याची चौकशी सुरू आहे.सेलुतही दोन दिवसांपूर्वी हे पथक चौकशीसाठी आले होते या पथकाने बॉंड विक्रेत्याची चौकशी करत विक्री केल्याची लिस्टच घेतली आहे आणि इतर चौकशी करून हे पथक मुंबईला रवाना झाले.
चुकीचा प्रकार समोर यावा म्हणून हा प्रकार पक्षाच्या नेत्याच्या लक्षात आणून दिला- हरिभाऊ लहाने
जे शपथ पत्र देण्यात आले त्यामध्ये चुकीचा प्रकार झालाय आणि हे चुकीचा प्रकारच जेव्हा लोकांनी आम्हाला सांगितला हीच बाब पक्षाचे नेत्यांकडे मी मांडली आहे यावरून राज्यभरामध्येच क्राईम ब्रांच याची चौकशी करत आहे सेलूतही तशी चौकशी त्यांनी केली अशी माहिती सेलूतील माजी आमदार तथा शिंदे गटाचे नेते हरिभाऊ लहाने यांनी एबीपी माझाला बोलताना दिली आहे