Parbhani News : परभणीकर आज (25 ऑगस्ट) एका सुंदर खगोलीय घटनेचे साक्षीदार ठरले. तळपत्या सूर्याला इंद्रधनुष्याने वेढल्याचा सुखद अनुभव आज परभणीतील (Parbhani) नागरिकांनी घेतला. दुपारच्या वेळी आज सूर्याभोवती इंद्रधनुष्याचे गोल रिंगण तयार तयार झाले जे सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे होते. या गोल रिंगण प्रक्रियेला मराठीत सूर्याभोवतीचे प्रभामंडळ असे म्हणतात. तर वैज्ञानिक भाषेत या घटनेला सन हेलो (Sun Halo) म्हटलं जातं, जी एक सर्वसामान्य खगोलीय घटना आहे. अतिशय मनमोहक असे हे दृश्यं पाहण्यासारखे असते. परभणी शहरासह जिल्हाभरातून हे दृश्य आकाशात पाहायला मिळाले आहे. परभणीकरांनी सूर्याच्या भोवती सात रंगांचं गोलाकार कडं पाहिलं आणि आपल्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद करुन सोशल मीडियात फोटो शेअर केले.


याआधी 24 मे 2021 रोजी बंगळुरु तर 26 एप्रिल 2021 रोजी झाशीमधील आकाशात असाच नजारा दिसला होता. भारतात ही घटना दुर्मिळ असली तरी थंड हवामान असलेल्या देशांमध्ये अशा खगोलीय घटना सामन्य आहेत.



जाणून घेऊया सन हेलो (Sun Halo) म्हणजे काय आणि ही घटना कधी घडते?


या घटनेला काय म्हणतात?
सूर्याच्या भोवत बनणाऱ्या सतरंगी कड्याला 'सन हेलो' म्हटलं जातं. ही एक सामान्य खगोलीय घटना आहे. जेव्हा सूर्य पृथ्वीच्या 22 अंशात असतो, त्यावेळी आकाशात 20 हजार फुटांवर सिरस क्लाऊडमुळे (आर्द्रता असलेले असे ढग ज्यांचा थर अतिशय पातळ असतो) हे गोलाकार कडं बनतं. सूर्य किंवा चंद्राची किरणे सिरस ढगांमध्ये असलेल्या हेक्सागोनल बर्फाच्या कणांच्या माध्यमातून परावर्तित होऊन 'हेलो' तयार होते. 


Sun Halo कधी बनतं?
वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, "ही आपल्या देशातील दुर्मिळ घटना असली तर थंड हवामान असलेल्या देशांमध्ये ही घटना सामान्य आहे. जेव्हा सूर्याभोवत आर्द्रता असलेले ढग असतात तेव्हा ही घटना घडते. त्यामुळे अशाप्रकारचं दृश्य एकाच परिसरात दिसतं." या घटनेची भविष्यवाणी केली जाऊ शकत नाही. सूर्याजवळ आर्द्रतायुक्त ढग असतात त्यावेळी ही घटना घडते. चक्रीवादळानंतर असे ढग तयार होतात आणि अशाप्रकारे सूर्याभोवती इंद्रधनुष्याचे प्रभामंडळ तयार होते, असंही म्हटलं जातं. आज परभणीकर या दुर्मिळ खगोलीय घटनेचे साक्षीदार बनले.