बंगळुरु : बंगळुरुमध्ये काल (24 मे) सकाळी अकराच्या सुमारास आकाशात अद्भुत दृश्य पाहायला मिळाला.  ज्यांनी कोणी हा नजरा पाहिला तो पाहातच राहिला. बंगळुरुतील नागरिकांनी सूर्याच्या भोवती सात रंगांचं गोलाकार कडं पाहिलं आणि आपल्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद करुन सोशल मीडियात फोटो शेअर केले. सुमारे तासभर हे चित्र कायम होतं. हे फोटो व्हायरल झाले. वैज्ञानिक भाषेत या घटनेला सन हेलो (Sun Halo) म्हटलं जातं, जी एक सर्वसामान्य खगोलीय घटना आहे.


जाणून घेऊया सन हेलो (Sun Halo) म्हणजे काय आणि ही घटना कधी घडते?


या घटनेला काय म्हणतात?
सूर्याच्या भोवत बनणाऱ्या सतरंगी कड्याला 'सन हेलो' म्हटलं जातं. ही एक सामान्य खगोलीय घटना आहे. जेव्हा सूर्य पृथ्वीच्या 22 अंशात असतो, त्यावेळी आकाशात सिरस क्लाऊडमुळे (आर्द्रता असलेले असे ढग ज्यांचा थर अतिशय पातळ असतो) हे गोलाकार कडं बनतं. सूर्य किंवा चंद्राची किरणे सिरस ढगांमध्ये असलेल्या हेक्सागोनल बर्फाच्या कणांच्या माध्यमातून परावर्तित होऊन 'हेलो' तयार होते.


Sun Halo कधी बनतं?
वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, "ही आपल्या देशातील दुर्मिळ घटना असली तर ठंड हवामान असलेल्या देशांमध्ये ही घटना सामान्य आहे. जेव्हा सूर्याभोवत आर्द्रता असलेले ढग असतात तेव्हा ही घटना घडते. त्यामुळे अशाप्रकारचं दृश्य एकाच परिसरात दिसतं." या घटनेची भविष्यवाणी केली जाऊ शकत नाही. सूर्याजवळ आर्द्रतायुक्त ढग असतात त्यावेळी ही घटना घडते. याआधी 26 एप्रिल रोजी असाच नजारा झांसीमधील आकाशात दिसला होता.


चंद्राच्या प्रकाशातही बनतं 'हेलो'
केवळ सूर्यप्रकाशामध्येच 'हेलो' बनतं असं नाही. अनेकदा रात्री चंद्राच्या प्रकाशातही 'हेलो' बनतं. प्रक्रिया तीच आहे, जेव्हा आकाशात आर्द्रतायुक्त ढग सूर्य किंवा चंद्राभोवती असल्यास आणि पृथ्वीच्या 22 अंशात असल्यास 'हेलो' बनतं. याला 'मून रिंग' किंवा 'विंटर हेलो' देखील म्हटलं जातं. चंद्राचा प्रकाश फार प्रखर नसल्यामुळे या 'हेलो'ला कोणताही रंग नसतो.