Parbhani Rain News: मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तर परभणी जिल्ह्यात (Parbhani District) आतापर्यंत सरासरीच्या 91 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी एकाच दिवसांत 8 मंडळात 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. सोयाबीन, कापुस, फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर तात्काळ पीक विमा, नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
परभणी जिल्ह्यात यंदा पावसाने अक्षरशः खेळ मांडला असुन, सुरुवातीला पेरणी नंतर एक महिना पावसाने खंड दिला होता. त्यानंतर सतत पाऊस (Rain) बरसत आहे. शुक्रवारी परभणी जिल्ह्यात 8 मंडळात 65 मिमीपेक्षा जास्त पाऊस झालाय. यामुळेच शेतकऱ्यांचे काढणीला आलेले आणि काढून ठेवलेले सोयाबीन पाण्यात मिळाले आहे. ठिकठिकाणी सोयाबीनला कोंब फुटले असुन, यासोबतच कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच संत्रा, मोसंबी, सीताफळ बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ पीक विम्यासह, भरीव मदत करावी अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. परभणीच्या जांब मंडळातील सोयाबीन पिकाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.
दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल
शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास परभणी शहरासह जिल्ह्याला पावसाने विजांच्या कडकडाटासह झोडपून काढले. शहरात काही वसाहती व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. अखेरच्या टप्प्यात असलेले सोयाबीन, कापूस यासह मुगाचे या पावसाने मोठे नुकसान झाले. काही भागात सोयाबीन काढणी सुरू असताना पाऊस आल्याने पीक हातचे गेले. शुक्रवारी सकाळी पाथरी व जिंतूर शहरात पावसाची जोरदार हजेरी राहिली. वसमत रोडवरील काही भागांमध्ये पावसाचे पाणी शिरले. तर जिल्ह्यातील खंडाळी( ता,गंगाखेड), मुदगल, विटा,वाघाळा (ता.पाथरी), शेळगाव, सोनपेठ, पालम, दैठणा, गंगाखेड, खळी, ताडकळस, पूर्णा, झरी, ताडबोरगाव, पेडगाव या ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
पाथरी तालुक्यात अति मुसळधार पाऊस
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात शुक्रवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पाथरी शहरात पावसाला सुरुवात झाली. तब्बल दीड तास अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाने पाथरीत अनेकांची धावपळ उडवली. या जोरदार पावसाने शहरातील बाजार समिती परिसरात पाणी तुंबले होते. परिणामी अनेक भागात पाणी रस्त्यावर असल्याचे चित्र सुद्धा पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या...
Tomato Price : परतीच्या पावसामुळं टोमॅटोची आवक घटली, दरात 10 ते 15 रुपयांची वाढ