Marathwada Rain Update: राज्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) झालेल्या नुकसानीबाबत सरकराने यापूर्वीचा नुकसानभरपाईची घोषणा केली आहे. मात्र निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचं काय होणार असा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान अशा निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील 6 लाख 44 हजार 993 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 597 कोटी 54 लाख रुपयांचा निधी जमा केला जाणार आहे. मराठवाड्यातील निकषात न बसणाऱ्या 43 लाख 8 हजार 487 हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी ही नुकसानभरपाई मिळणार आहे.
जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र नुकसानभरपाईच्या निकषात बसत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या यादीतून वगळण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा मोठी नाराजी पाहायला मिळत होती. दरम्यान 30 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत करण्याचा निर्णय घेतला. तर एसडीआरएफच्या निकषापलीकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा भरीव लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 597 कोटी 54 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती निधी...
जिल्हा | शेतकरी संख्या | बाधित क्षेत्र | मदतनिधी |
औरंगाबाद | 16410 | 12679 | 1750.61 |
जालना | 1150 | 678 | 97.81 |
परभणी | 4486 | 2545.25 | 346.15 |
हिंगोली | 134406 | 96677 | 13214.94 |
बीड | 160 | 48.80 | 17.21 |
लातूर | 342071 | 213251 | 29002.14 |
उस्मानाबाद | 146310 | 112609.95 | 15325.17 |
एकूण | 644993 | 438487 | 59754.03 |
संबंधित बातमी...