Palghar Latest News update : थंडीची चाहूल लागताच पाणथळ जागांजवळ या कुरव म्हणजेच आपल्याला परिचित असलेल्या सीगल पक्षांची रेलचेल सुरू होते. शहरातील तलाव, खाडी व समुद्रकिनारी या पक्षांचे थवे आपल्याला हवेत उडताना, पुलांवर किंवा तलावाच्या कट्ट्यावर बसलेले दिसतात. हे कावळ्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे पांढरे पक्षी म्हणजेच कुरव पक्षी होय. या कुरव पक्षांच्या बऱ्याच जातींपैकी आपण आज तपकिरी डोक्याचा कुरव या पक्षाबद्दल जाणून घेणार आहोत. यांचे शास्त्रीय नाव क्रोईकोसेफालस ब्रुनोसेफालस असे आहे. यात क्रोईकोसेफालस म्हणजे विशिष्ट रंगाचे डोके असलेला व ब्रुनोसेफालस म्हणजे तपकिरी रंगाशी निगडीत. यांच्या आवाजामुळे यांचे मराठी नाव कुरव असे ठेवण्यात आले असावे.
कुरव पक्षांच्या पिसांच्या रंगामध्ये विणीच्या हंगामानुसार व वयोमानानुसार अनेक बदल होतात. आपल्याकडे जेव्हा हे पक्षी हिवाळ्यात येतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्याचा रंग तपकिरी नसतो. पण मार्च-एप्रिलदरम्यान त्यांना तपकिरी रंगाची पिसे येतात. नर व मादी दिसायला सारखेच असले तरी पिल्लांचा रंग सुरुवातीच्या काही वर्षांपर्यंत थोडा वेगळा असतो. वयस्क नर व माधीच्या पंखांचा रंग फिकट राखाडी व पोट पांढरे असते. पंखांच्या कडा काळ्या असून त्यावर पांढरे चट्टे असतात. चोच लाल रंगाची असून पांढरे डोळे व त्यात काळी बाहुली असते. गालावर काळसर डाग असतो. विणीच्या हंगामात चेहऱ्याचा भाग पूर्ण तपकिरी होतो. भारतीय उपखंडात भारताबरोबर मंगोलिया,बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका या देशातही यांचा वावर असतो. पाण्यातील मासे, मृदुकाय जीव, मृत प्राण्यांचे अवशेष हे त्यांचे प्रमुख अन्न आहे.
हिवाळ्यामध्ये हिमालयामधील नद्या व सरोवरे बर्फाने गोठल्यामुळे या पक्ष्यांना अन्न मिळवणे कठीण होते. म्हणूनच हे पक्षी भारतातील कमी थंडीच्या प्रदेशात दाखल होतात. मे महिन्यापासून यांच्या विणीच्या हंगमला सुरुवात होते व ते पुन्हा हिमालयात निघून जातात. तेथे पाणथळ जागांच्या किनारी भागात गवताच्या कड्या गोळा करून घरटे तयार केले जाते. दोन ते तीन अंड्यांमधून महिन्याभरात पिल्ले बाहेर पडतात. काही महिन्यातच म्हणजे हिवाळा यायच्या आत ते आपल्या पिल्लांना बरोबर घेऊन स्थलांतर करतात.पालघर जिल्ह्यात येणाऱ्या आशा स्थलांतरित पक्षांना निहाळण , त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करणं हे काम पालघर मधील पक्षी निरीक्षक प्रविण बाबरे करत असतात.
आणखी वाचा :