मुंबई: महापालिकेच्या विक्रोळी येथील शाळेतून दोन मुलांचे अपहरण झाल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणारी ही क्लिप बनावट असून तशा पद्धतीची कोणतीही घटना घडली नाही असा खुलासा मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे. जर तशा प्रकारची घटना घडली असेल तर त्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही पोलिसांनी दिलं आहे. 


गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर HDIL प्रिमियर  कोहिनुर, कांजूरमार्ग या रहिवाशी सोसायटीतील आणि महापालिकेच्या विक्रोळी येथील शाळेत शिकणाऱ्या दोन मुलांचे अपहरण झाल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. अशा दोन क्लिप असल्याची माहिती पोलिसांना आहे. 


पोलिसांनी या क्लिपच्या अनुषंगाने तपास केला असता या क्लिप बनावट असल्याचं समोर आलं. तशी कोणतीही घटना घडली नसल्याचं पोलिसांना निदर्शनाला आलं आहे. विक्रोळी पार्कसाईट, कांजूरमार्ग आणि घाटकोपर पोलीस  ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी स्वत: याची खात्री केली. 


या ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख केलेल्या अपहरणाची कोणतीही घटना घडली नाही. पोलिसांनी या परिसरातील नागरिकांचीही बेट घेतली. या परिसरातून तशा प्रकारची कोणतीही तक्रार पोलिसांनी सांगितलं आहे. 


तक्रार आल्यास कारवाई करू 


अशी कोणतीही तक्रार अद्याप आली नाही, पण तशी तक्रार आल्यानंतर कारवाई करु असं आश्वासनही पोलिसांनी दिलं आहे. सदरची ऑडिओ क्लिप बनावट आहे, आणि तशी कोणतीही घटना घडली नाही याची माहिती माध्यमांनी नागरिकांपर्यंत पोहोचवावी असं आवाहन मुंबई पोलिसांच्या परिमंडल सात कडून करण्यात आलं आहे. यामुळे जनतेमध्ये जागृती होईल आणि जनतेच्या मनातील भीती कमी होईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :