Vasai Virar News: गेल्या चार पाच दिवसापासून वसई विरारमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. तर अधूनमधून जोरदार पाउस ही बरसत आहे. रविवारी सायंकाळी साढेपाच वाजण्याच्या सुमारास वसईच्या गोखिवरे येथील गौराईपाडा येथे दोन चाळी कोसळून, घरात राहणारी दोन मुलं किरकोळ जखमी झाली आहेत. मात्र 24 तास उलटूनही पालिकेनं या उद्ध्वस्त कुटुंबाला संक्रमण छावणीत ठेवलेलं नाही. या पावसात हे दोन कुटुंब उघड्यावर आले आहेत. विशेष म्हणजे कोर्टाने चाळी तोडण्याच्या ऑर्डर ही दिल्या आहेत, मात्र पालिकेने याकडे दुर्लक्ष केलं आहे.
दोनच दिवसापूर्वी सातीवली येथे डोंगराचा भाग कोसळलेला होता. सुदैवाने त्यात कुणीही जखमी झालं नाही. तोच रविवारी सायंकाळी साढे पाचच्या दरम्यान वसईच्या गोखिवरे येथील गौराई पाडा येथे दोन चाळीची रुम कोसळून, यात राहणारे पाठक आणि यादव कुटुंब रस्त्यावर आले आहेत. घर कोसळल्याने प्रिन्स राम आणि आर्यन यादव ही दोन मुलं किरकोळ जखमी झाली आहेत. सुदैवाने रात्रीच्या झोपेत घर कोसळलं नसल्याने मोठी हानी टळली आहे. परंतु या घटनेला 24 तास उलटूनही या दोन्ही कुटुंबांना पालिकेने संक्रमण शिबिरात ठेवलेलं नाही. हे दोन्ही कुटुंब रिमझिम पावसात उघड्यावरच राहत आहेत.
या घटनेआधी या जमिनीचे मालक कुंदन पाटील यांनी या ठिकाणी बनलेल्या चाळीबाबत पालिकेला वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका ही दाखल केली होती. न्यायालयाने ही 8 जानेवारी 2020 ला चाळी तोडण्याच्या ऑर्डर दिल्या होत्या. मात्र पालिकेने याकडे कोणतही लक्ष दिलं नसल्याचा आरोप जमिन मालकाने केला आहे. तर आम्ही कारवाई करतो, असं थातूर माथूर उत्तर पालिकेच्या उपायुक्तांनी दिलं आहे.
दरम्यान, दोन महिन्यापूर्वी राजवली येथे दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. दोन दिवसापूर्वी सातीवली येथे दरड कोसळली होती. मात्र यात सुदैवाने कुणाचाही जीव गेला नाही. रविवारी दोन चाळ कोसळल्या, सुदैवाने जिवितहानी झाली नसली, तरी पालिकेने आता तरी अशा धोकादायक चाळी लवकरात लवकर तोडल्या पाहिजेत जेणेकरुन भविष्यात मोठी जिवीतहानी होणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या:
Mount Mary Fair : चोरी करण्यासाठी मुंबईत आलेल्या राजस्थानमधील जोडप्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील समस्यांमुळं प्रवाशी त्रस्त; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित अजित पवार म्हणाले...