पालघर जिल्ह्यात माता, बालमृत्यूचं ग्रहण सुटेना, गेल्या 11 वर्षातील चिंताजनक आकडेवारी आली समोर
Palghar News : पालघर जिल्ह्याला कुपोषणासह बालमृत्यू आणि मातामृत्यूचे लागलेले ग्रहण सुटता सुटत नाहीये. गेल्या 11 वर्षातील बालमृत्यू आणि मातामृत्यूची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.
पालघर : जिल्ह्याला कुपोषणासह (Malnutrition) बालमृत्यू आणि मातामृत्यूचे (Maternal and child Death) सातत्याने ग्रहण लागलं आहे. हे ग्रहण सुटता सुटत नाहीये. पालघर जिल्हा निर्मितीपासून बालमृत्यू आणि माता मृत्यूचे प्रमाण सातत्याने वाढत असून गेल्या अकरा वर्षात 4 हजार 19 बालमृत्यू झाले असून 149 मातांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला कुपोषणासह विविध कारणे जबाबदार आहेत. गेल्या 11 वर्षात हे बालमृत्यू आणि मातामृत्यू झाले असले तरी गेल्या तीन वर्षात पालघर जिल्ह्यातील मृत्यूंचा आलेख कमी होत चालला आहे, असे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले आहे.
पालघर (Palghar) जिल्ह्यातील बालके किंवा माता परजिल्ह्यात दगावली तर त्यांची नोंद जिल्ह्यात होत नसल्याने आकडेवारीत बदल होण्याची शक्यता आहे. तत्कालीन ठाणे जिल्हा असताना जव्हारमधील वावर-वांगणीमध्ये कुपोषण व बालमृत्यूच्या आकडेवारीचा स्फोट झाला. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून या प्रकाराबाबत संताप व हळहळ व्यक्त झाली. यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागे झाले व कोट्यवधीचा निधी ग्रामीण भागासाठी कुपोषण निर्मूलनाच्या नावाखाली येत गेला.
आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान
पालघर जिल्ह्याच्या जव्हार, मोखाडा, डहाणू तलासरी व वाडा अशा ग्रामीण भागांमध्ये कुपोषणाबरोबरीने बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. ग्रामीण भागांमध्ये बालविवाहासारख्या अनिष्ट रूढी परंपरा अजूनही कमी झालेल्या नाहीत. पालघर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात पाचशेहून अधिक बालविवाह झाल्याचे अलीकडे एका सर्वेक्षण अहवालातून समोर आले होते. न्यायालयानेही या संदर्भात राज्य शासनाला फटकारले होते. बाल विवाहामुळे कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यू सारखे गंभीर परिणाम समोर येत आहेत. पालघर जिल्ह्यात सर्वाधिक बालमृत्यू हे मुदतपूर्व प्रसूती (कमी दिवसात जन्मलेली बालके/प्रिमॅच्युर) झाल्यामुळे दगावल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुदतपूर्व प्रसूती होण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते थांबवण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. इतर कारणांमुळेही बालमृत्यू होत आहेत.
पालघर जिल्ह्यात माता आणि बालमृत्यूची स्थिती चिंताजनक
कुपोषण, कमी दिवसात जन्मलेले बाळ, कमी वजनाचे बाळ, इतर आजार, अपघात, श्वासोच्छ्वास कोंडणे अशा विविध कारणांनी 0 ते 6 वर्षांच्या बालकांचा बालमृत्यू होत असल्याचे तज्ज्ञमार्फत सांगण्यात येते. तर रक्तक्षय, मुदत पूर्व प्रसूती, शारीरिक कमजोरी, हृदयविकार अशा कारणांमुळे माता मृत्यू होत आहेत. पालघर जिल्ह्यात मुदतपूर्व प्रसूतीमुळे बालकांची मृत्यू झाल्याची संख्या जास्त असली तरी कमी वजनाचे बाळ जन्मल्यामुळेही मृत्यूचे प्रमाण आहे. पालघर जिल्ह्यामधील माता मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे. गेल्या अकरा वर्षांमध्ये प्रति लाख जिवंत माता मागे दरवर्षी 30 पेक्षा जास्त मातांचा मृत्यू प्रमाण समोर आला आहे. 2014-15 मध्ये हे प्रमाण 64 इतके होते यावर्षी जूनपर्यंत हे प्रमाण 72 इतके आहे.
कमी दिवसात जन्मलेली बालके दगावल्याची संख्या लक्षणीय
पालघर जिल्ह्यात आतापर्यंत कमी दिवसात जन्मलेली बालके दगावल्याची संख्या लक्षणीय आहे. तर मुदतपूर्व प्रसूती, जन्मतः श्वासोच्छवास कोंडून, तीव्र फुफ्फुस विकार,अपघात, जन्मतः व्यंग, जंतू संसर्ग, प्राणी व सर्पदंश, हृदयविकार, ताप, डायरिया, अतिसार, हायपोथेरीमीया, पचनसंस्था दोष, दमा, मेंदूज्वर अशा आजारांमुळे बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये आरोग्य विभागासह महिला बाल विकास विभाग ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाने जिल्ह्यात बालमृत्यू कमी करण्यासाठी राबविण्यात आलेले कुपोषण निर्मूलन प्रभावीपणे राबवले जात असल्यामुळे राज्याच्या तुलनेत गेल्या तीन वर्षात पालघर जिल्ह्यातील बालमृत्यूमध्ये घट झालेली आहे.
मृत्यू होऊ नये हेच उद्दिष्ट : डॉ. सागर पाटील
पालघर जिल्ह्यातील बालमृत्यू, मातामृत्यू वास्तववादी असले तरी गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधींनी केलेले प्रयत्न, आरोग्य विभागासह इतर विभागांच्या समन्वयामुळे व जनजागृतीमुळे बालमृत्यू कमी होत आहेत. राज्याच्या व राष्ट्रीय पातळीवरील मृत्यूदरापेक्षा पालघर जिल्ह्यातील मृत्युदर अत्यल्प आहे. मात्र, मृत्यू होऊ नये हेच आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत असून त्याचाच परिणाम म्हणून मागील वर्षांमध्ये या संख्येत सातत्याने घट होत असल्याची प्रतिक्रिया जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. सागर पाटील यांनी दिली आहे.
पालघरमधील आतापर्यंतचे बाल-माता मृत्यू
वर्ष | बालमृत्यू | मातामृत्यू |
2014-15 | 626 | 16 |
2015-16 | 565 | 15 |
2016 -17 | 557 | 18 |
2017-18 | 469 | 19 |
2018-19 | 348 | 13 |
2019-20 | 303 | 9 |
2020-21 | 296 | 12 |
2021-22 | 294 | 20 |
2022-23 | 279 | 9 |
2023-24 | 224 | 14 |
2024 - 25 (जून) | 58 | 4 |
2014 ते 2024 (जून) पर्यंतचे तालुका निहाय बालमृत्यू
- मोखाडा - 341
- जव्हार - 1100
- विक्रमगड - 390
- वाडा - 407
- पालघर - 494
- तलासरी - 261
- डहाणू - 909
- वसई - 91
आणखी वाचा
पालघर जिल्ह्यात तब्बल अडीच हजार गरोदर महिला 19 वर्षाखालील , धक्कादायक माहिती समोर