Palghar News: 'तो' दबा धरून बसलेला अन्... बिबट्याचा हल्ला, मान, पाठ, पोटावर चावा; मजूर गंभीर जखमी
Palghar News: पालघरमध्ये बिबट्याचा मजुरावर गंभीर हल्ला, मजुराच्या मान, पाठ आणि पोटावर चावा. मजुरावर रुग्णालयात उपचार सुरू
Palghar News: पालघर : जव्हार (Jawhar) शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोरठण (Gorthan) गावातील 29 वर्षीय हरेश अशोक चौधरी या तरुण मजुरावर बिबट्यानं हल्ला चढविला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) तरुण गंभीर जखमी झाला असून, त्या मजुराच्या मानेवर, पाठीत आणि हाताला बिबट्यानं चावा घेतल्यानं, मजूर गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 14 मार्च रोजी, गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. सदर घटनेचा वनविभागानं तात्काळ पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केल्याचं वन विभागानं सांगितलं. तसेच, त्या बिबट्याचा तपास करण्याकरिता ट्रॅप कॅमेरा लावण्यात येतील, असं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
जव्हार शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोरठण गावातील 29 वर्षीय हरेश अशोक चौधरी हा मजूर शंभर ओहळजवळ रस्त्यालगत दुतर्फा लागवड केलेल्या रोपांना पाणी देण्याकरिता गेला होता. झाडांना पाणी घालून झाल्यानंतर तो मजूर थोडा जंगलात रस्त्याच्या खाली उतरला, तसेच त्याच्या सोबत असलेले मजूर रस्त्यावर वरती होते. तेवढ्यात लपून बसलेल्या बिबट्याने त्या तरुण मजुरावर बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर त्या मजुराने आरडाओरड केल्यानंतर त्याच्या सोबत असलेले मजूर धावून आल्यानंतर त्या जखमी मजुराचा प्राण वाचला.
बिबट्याच्या हल्यात हरेश चौधरी हा युवक मजूर गंभीर जखमी झाला आहे. हा बिबट्याचा हल्ला 14 मार्च रोजी, गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली आहे. बिबट्याच्या हल्यात जखमी झालेल्या तरुण मजुराच्या मानेवर, पाठीत, आणि हाताला बिबट्यानं मोठा चावा घेवून गंभीर दु:खापत केली आहे. त्यानंतर या मजुराला तात्काळ जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्या मजुरावर किरकोळ उपचार करून पुढे त्याला नाशिकच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मजुराला झालेली जखम मोठी असल्यानं त्याला नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
गोरठण गावाजवळील भरसटमेटलगत शंभर ओहळाखालीच्या खाली बिबट्या लपल्याचं त्या मजुरांनी सांगितलं. त्या बिबट्याला पकडण्याकरिता ट्रॅप कॅमेरे लावून त्या बिबट्यांची हालचाल कॅमेऱ्यात कुठे दिसतेय का? याचा शोध घेऊन त्या बिबट्याला पकडलं जाईल, असं वन विभागानं सांगितलं. या पुढे त्या गोरठण गावाजवळ भरसटमेटलगत जंगलात जाताना त्या भागातील शेतकऱ्यांनी एकट्यानं न जाता गोळा होवून एकत्र गाजवाजा करत, मोठ्यानं बोलत जावं अशा सूचना वन विभागानं दिल्या आहेत.