'सीमेपलीकडूनच दहशतवाद सुरू', सिंधू जल कराराच्या स्थगितीमुळे पाकिस्तानची पाणी कोंडी; भारताने पत्र लिहून निर्णयाचे कारण सांगितलं
सिंधू जल कराराच्या स्थगितीमुळे पाकिस्तानची पाणी कोंडी होत असताना भारताच्या जलसंपदा सचिव देबाश्री मुखर्जी यांनी त्यांच्या पाकिस्तानी समकक्षांना पत्र लिहून या निर्णयाचे कारण सांगितलंय.

Indian Suspended Indus Water Treaty : भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) आतापर्यंत 28 भारतीय पर्यटकांना जीव गमवावा लागलाय. यानंतर केंद्र सरकारने गंभीर पावले उचलत पाकिस्तानची चहुबाजूंनी कोंडी करायला सुरुवात केली आहे. पहलगाम मधील निष्पाप पर्यटकांवरील भ्याड हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कायदेशीर सर्जिकल स्ट्राइक करताना दुसऱ्याचा दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाच मोठे निर्णय घेतले. यामध्ये 65 वर्ष जुना सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला आहे. या सिंधू जल कराराच्या स्थगितीमुळे पाकिस्तानची पुरती पाणी कोंडी होणार आहे. अशातच भारताच्या जलसंपदा सचिव देबाश्री मुखर्जी यांनी त्यांचे पाकिस्तानी समकक्ष असलेल्या सय्यद अली मुर्तझा यांना लिहिलेल्या पत्रात या निर्णयाचे सविस्तर वर्णन करत भारताने घेतलेल्या या निर्णयामागचे कारण सांगितलंय.
वृत्तसंस्था पीटीआय नुसार, पत्रात म्हटले आहे की जम्मू आणि काश्मीरला लक्ष्य करून पाकिस्तानकडून सतत सीमापलीकडून दहशतवाद सिंधू पाणी करारातर्गत भारताच्या अधिकारांना बाधा आणतो. पत्रात पुढे म्हटले आहे की ,"आम्ही सीमेपलीकेकडील पाकिस्तानकडून सतत होणारा दहशतवाद पाहिला आहे". या अशा कृतींमुळे सुरक्षा अनिश्चितता निर्माण झाली आहे. ज्यामुळे भारताला त्याच्या करार अधिकारांचा पूर्णपणे वापर करण्याच्या क्षमतेत अडथळा निर्माण झाला आहे. असा उल्लेख या पत्रात केला आहे.
हे युद्ध छेडण्यासारखे आहे, पाकिस्तानचा संताप
दुसरीकडे , भारताने पाकिस्तानविरोधात दिलेल्या जोरदार राजनैतिक प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ माजली आहे. यावर पाकिस्तानने म्हटले आहे की, सिंधू पाणी करारांतर्गत पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह रोखण्याचा किंवा बदलण्याचा कोणताही प्रयत्न युद्ध पुकारण्यासारखा मानला जाईल.असेही उत्तर पाकिस्तान कडून आले आहे. तर दुसरीकडे सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयाला पाकिस्तानी मंत्र्यांनी भ्याड म्हटलं आहे. द डॉनच्या वृत्तानुसार पाकिस्तानचे ऊर्जामंत्री म्हणाले, हा करार संपवणे म्हणजे जलयुद्ध आहे. हे अतिशय भ्याड आणि बेकायदेशीर पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलंय. यासोबतच, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशाविरुद्ध उचललेल्या पावलांना प्रतिसाद म्हणून भारतासोबतचा व्यापार, शिमला करारासह द्विपक्षीय करार आणि हवाई क्षेत्र बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची वाळू पुरती सरकली आहे.
शाहबाज शरीफ काय म्हणाले?
शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानकडून ही काही घोषणा करण्यात आल्या. पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या आणि राजनैतिक संबंध कमी करण्याच्या भारताच्या हालचालींना योग्य प्रतिसाद देण्याचा विचार करण्यासाठी शरीफ यांनी प्रमुख सरकारी मंत्री आणि तिन्ही सेवा प्रमुखांसोबत बैठका घेतल्या. राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या (एनएससी) बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "पाकिस्तान भारतासोबतचे सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याचा अधिकार वापरेल, ज्यामध्ये शिमला कराराचा समावेश आहे".
निवेदनात पुढे म्हटले आहे की, पाकिस्तान वाघा सीमा चौकी तात्काळ बंद करेल. शिवाय "या मार्गाने भारतातून होणारे सर्व सीमापार वाहतूक कोणत्याही अपवादाशिवाय निलंबित राहील. ज्यांनी वैध परवानगीने सीमा ओलांडली आहे ते त्या मार्गाने ताबडतोब परत येऊ शकतात, परंतु 30 एप्रिलनंतर हे शक्य होणार नाही." असेही त्यात म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























