Osmanabad Name change : उस्मानाबादचं नामांतर धाराशिव, 25 वर्षांपूर्वीच झाला होता निर्णय
Osmanabad Dharashiv : औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
![Osmanabad Name change : उस्मानाबादचं नामांतर धाराशिव, 25 वर्षांपूर्वीच झाला होता निर्णय Osmanabad Dharashiv 25 years ago osmanabad name change shiv sena bjp government Osmanabad Name change : उस्मानाबादचं नामांतर धाराशिव, 25 वर्षांपूर्वीच झाला होता निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/29/c2af74c899e36599122fb62b8b307b5f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Osmanabad Dharashiv : औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज मंजूरी देण्यात आली असली, तरी शिवसेनेची ही मागणी तब्बल 25 वर्षांपूर्वीची आहे. 25 मे 1995 रोजी उस्मानाबादच्या नामांतराची प्रथम घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केली होती. त्यानंतर युतीच्या काळात औरंगाबादमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तबही करण्यात आले होते. त्यानंतर दोन जणांनी या निर्णायाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून नामांतर ठरावास स्थगिती मिळविली होती.
उस्मानाबादचे मुळचे नावच धाराशिव आहे. धाराशिव हे नाव 1927 पर्यंत प्रचलित होते. उस्मानाबाद शिवाय एदलाबादचे मुक्ताईनगर...अंबोजोगाईचे मोमिनाबाद आणि पुन्हा अंबाजोगाई असे नामांतर काँग्रेसच्या काळात झाले आहे, तीही ही नावे ऐतिहासिक होती म्हणून. औरंगाबाद हे मलिक अंबरने वसविलेले शहर आहे. त्या शहराच्या नामांतराची सेनेची भूमिका राजकीय आहे. उस्मानाबादचे धाराशिव हे सांस्कृतीक नावे आहे, असे इतिहासाचे अभ्यासक जयराज खोचरे यांनी सांगतात.
उस्मानाबाद की धाराशिव? इतिहास काय सांगतो?
निजामाने मराठवाड्यातील अनेक शहरांची नामांतरे केली होती. त्यामध्ये उस्मनाबाद या शहराचाही समावेश आहे. उस्मानाबादचं जुनं नाव धाराशिव असंच होतं. ग्रामदैवत असलेल्या धारासुर मर्दिनी या देवीच्या नावावरून धाराशिव असल्याचे पुरावे सापडतात. पण निजामशाही मधील सातवा निजाम उस्मान अली खान याच्या नावावरून धाराशिव शहराचे नाव उस्मानाबाद झाल्याचेही संदर्भ आढळतात. नगर परिषदेच्या सुधारित नगर विकास योजनेच्या प्रकरण एक मध्ये उस्मान अली खान यांनी सन 1900 साली धाराशीव हे नाव बदलून उस्मानाबाद केलं, असा उल्लेख आहे.
1995 च्या युती सरकारनेच घेतला होता निर्णय -
शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये उस्मानाबाद नाव कधीच लिहण्यात येत नाही, त्याचा उल्लेख नेहमीच धाराशिव असा केला जातो. त्याच प्रमाणे औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच केला जातो. 2019 मध्ये उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकवेळा त्यांच्या सोशल हँडलवरुन औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर तर उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव करण्यात आला आहे. मराठवाड्यातील अंबाजोगाईचं नाव निजामकाळात मोमिनाबाद होतं, पण तेही नंतर बदललं... आता ते अंबाजोगाई असं रुळलं आहे. 1997 मध्ये जळगावातील एदलाबादचे नामांतर मुक्ताईनगर करण्यात आले होते.
उस्मानाबादचं पुन्हा एकदा धाराशिव करण्याची घोषणा सर्वात आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. तुळजापूर येथील शिवसेनेच्या महिला मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या नामांतराची घोषणा केलेली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी 25 मे 1995 रोजी उस्मानाबादच्या नामांतराची घोषणा केली. तसंच, 1998 मध्ये युतीच्या (शिवसेना-भाजप ) सरकारने धाराशिव नामांतराबाबत सूचन आणि हरकती मागवल्या होत्या. त्यापूर्वीच दोन मुस्लीम शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून नामांतर ठरावास स्थगिती मिळविली होती. त्यानंतर सन २००० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मंत्रिमंडळ बैठकीत उस्मानाबादचं नामांतर धाराशिव हा निर्णय रद्द केला होता अन् औरंगाबाद खंडपीठात तसे कळवून याचिका निकाली काढली होती. आता तब्बल 25 वर्षानंतर पुन्हा एकदा शिवसेने उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)